Friday, April 26, 2024
HomeUncategorized‘इतिहास’ घडताना..!

‘इतिहास’ घडताना..!

नितीन कुलकर्णी

1934 पासून सुरू झालेल्या रणजी क्रिकेटमध्ये गेल्या आठ वर्षांत चारवेळा अंतिम फेरीत धडक मारणार्‍या सौराष्ट्रने प्रथमच चषकावर नाव कोरले आहे. पश्चिम बंगालला पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पराभूत करत सौराष्ट्रने अंतिम सामना खिशात घातला.

1950-51 च्या हंगामात पहिला रणजी सामना खेळणार्‍या सौराष्ट्रने तब्बल सात दशकांच्या कालखंडानंतर स्पर्धा जिंकली आहे. ज्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते त्या रणजित सिंह यांच्या राज्याने पहिल्यांदाच ही ट्रॉफी जिंकली आहे. सौराष्ट्रचा संघ 1951-52 च्या आधी नवानगर आणि वेस्टर्न इंडिया नावाने विभागलेला होता. 1960 नंतर मात्र दोन्ही संघ सौराष्ट्र नावाने स्पर्धेत सहभागी होऊ लागले. गुजरात आणि विदर्भ हा यांच्याशिवाय सौराष्ट्र हा गुजरातचा तिसरा संघ आहे. गेल्या दहा वर्षांत रणजी चषक जिंकणारा हा सौराष्ट्र चौथा नवीन संघ आहे. यापूर्वी राजस्थान, गुजरात आणि विदर्भाने हा बहुमान मिळवला होता. एकविसाव्या शतकात भारतीय क्रिकेट शहराकडून ग्रामीण भागाकडे वळू लागला. यादरम्यान इरफान पठाण, महेंद्रसिंह धोनी यांसारख्या खेळाडूंचा उदय झाला.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांत क्रिकेटपटूंना एका राज्यातून दुसर्‍या राज्यातही जाणे सोयीचे झाले आहे. पूर्वी संधी मिळाली नाही तरी खेळाडू आपल्याच राज्याकडून खेळण्याबाबत आग्रही असायचे. मात्र आता मुंबई, दिल्ली किंवा अन्य संघांकडून खेळण्याची संधी न मिळाल्यास ते अन्य संघांकडे जाताना दिसून येतात. मेघालय, मणिपूर, उत्तराखंड यांसारख्या संघांना त्यामुळे उभे राहण्याची संधी मिळाली. या बदलामुळे क्रिकेटची संस्कृतीदेखील बदलत चालली आहे. आता लहान संघदेखील दिग्गज मंडळींची परीक्षा घेत असल्याचे लक्षात येते.

काही वर्षांपर्यंत मेघालय, मणिपूर, नागालँड आणि सिक्कीम राज्याचे संघही खेळतात, हे ठाऊक नव्हते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सर्वच राज्यांना स्थान देण्याचे आदेश दिल्यानंतर या संघाचे अस्तित्व दिसू लागले. यावेळी हे संघ दिसले नसले तरी त्यांचा प्रभाव राहिला आहे.

रणजीत फलंदाजाला साजेशा खेळपट्ट्या तयार केल्या जातात. हे क्रिकेटच्या भवितव्यासाठी चांगले नाही. फलंदाज आणि गोलंदाजाला फायदेशीर ठरेल, अशा खेळपट्ट्या तयार करायला हव्यात. असो, रणजीच्या फायनलमध्ये दोन्ही संघांचे केवळ 24 गडी बाद झाले. पाटा खेळपट्ट्यांवर गोलंदाजांचा कस लागतो. परिणामी दोन्ही संघांना दोन दोन दिवस क्षेत्ररक्षण करावे लागले.

भारतीय नियामक मंडळाने रणजी सामन्यातही आधुनिक तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार केला जात असला तरी घरगुती सामन्यातही त्याचा वापर करायला हवा. त्याचवेळी रणजीत मुंबई आणि दिल्ली मागे पडण्याचे प्रमुख कारणे म्हणजे आघाडीचे खेळाडू हे राष्ट्रीय कर्तव्यावर तैनात असतात.

म्हणजेच त्यांना भारतीय संघात हजर राहणे गरजेचे ठरते. त्यामुळे हे संघ घरगुती मैदानावर चांगली कामगिरी करताना दिसून येत नाही. परंतु या संघाची दुसरी फळीदेखील तितकीच ताकदवान असणे आवश्यक आहे. एकमात्र निश्चित की, आगामी काळात सध्याच्या स्थितीला कमकुवत समजले जाणार्‍या संघाचा वरचष्मा राहू शकतो. म्हणूनच रणजीवर कोणा एकाचे वर्चस्व राहणे ही बाब आता इतिहासजमा झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या