Friday, April 26, 2024
HomeUncategorizedचतुरस्त्र लेखक हरपला !

चतुरस्त्र लेखक हरपला !

रत्नाकर मतकरींच्या रुपात एक चांगला, गुणवान लेखक आपल्याला सोडून गेला. त्यांची प्रत्येक कलाकृती विविधतेने नटलेली होती. हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं. हा लेखक सर्वार्थाने चतुरस्त्र होता. मतकरी हे साहित्यिक म्हणून खूप मोठे होते. मात्र मतकरींना महाराष्ट्राने, महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांनी योग्य तो मानसन्मान दिला नाही याची खंत वाटते. त्यांच्या जाण्याने माझ्या वैयक्तिक आयुष्यात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

मधु मंगेश कर्णिक ,ज्येष्ठ साहित्यिक

- Advertisement -

मतकरी गेल्याची बातमी कळली आणि मन अगदी सुन्न झालं. तब्बेत चांगली असल्यामुळे ते इतक्यात सोडून जातील, अशी पुसटशी शंकाही मनात आली नव्हती. मतकरींचं जाणं ही अत्यंत दु:खद घटना. त्यांच्यात लिहिण्याची प्रचंड ऊर्जा होती. म्हणूनच त्यांचं हे असं अचानक सोडून जाणं धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. मतकरींच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्वाचं न भरून निघणारं नुकसान झालं आहे. मतकरी हे पुरोगामी विचारांचे नाटककार, उत्तम विचारांचे लेखक होते. समांतर काळासोबत समांतर जाणारे लेखक असल्यामुळे समाजाचं मानसशास्त्र त्यांना बरोबर उमगायचं. त्यांनी कधी रंजनासाठी लेखन केलं नाही. मतकरींनी बालनाट्यांपासून लेखनाची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला. अनेकविध विषयांवरची नाटकं लिहिली. त्यांनी साहित्यकृतींमधलं वैविध्य जपलं. साहित्य असो वा नाटक, त्यांची प्रत्येक कलाकृती विविधतेने नटलेली असायची आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळे हा लेखक सर्वार्थाने चतुरस्त्र आणि सव्यसाची होता, असं म्हणता येईल.

त्यांचं ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक पुन्हा रंगमंचावर आलं. प्रचंड गाजलं. हे नाटक बघायला लोकांची गर्दी होत होती. रत्नाकर मतकरी हे सदातरुण लेखक होते. त्यांना समाजाचं भान होतं. मतकरींनी इंदिरा गांधींवर नाटक लिहिलं होतं. ‘इंदिरा’ हे त्यांचं अमृतमहोत्सवी नाटक होतं. हे नाटक ऐकायला मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांनी मला बोलावलं होतं. हे नाटक वादग्रस्त असलं तरी ते लिहिण्यामागची त्यांची भूमिका सकारात्मक आणि पुरोगामी होती. इंदिरा गांधी म्हटलं की आपल्याला आणीबाणीचा काळ आठवतो. आपण इंदिराजींना आणीबाणीच्या संदर्भात ओळखतो. मात्र त्यांनी त्याही पलीकडे इंदिरा गांधींचं एक व्यक्ती म्हणून चित्रण केलं होतं. इंदिरा गांधी राजकारणात किती परिपक्व आणि धाडसी होत्या हे मांडण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि मतकरींनी हे चित्रण खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं. त्यांनी इंदिराजींच्या कारकिर्दीची अखेरची नऊ वर्षं म्हणजे आणीबाणीपासून त्यांच्या हत्येपर्यंतचा काळ मांडला होता. हे निश्चितच मोठं आव्हान होतं. मात्र मतकरी यांच्या सिद्ध लेखणीने हे आव्हान लीलया पेललं. या नाटकाचे काही प्रयोग झाले. मात्र अशी व्यक्तीचरित्रात्मक नाटकं फारशी चालत नाहीत हे आपल्याला माहीत आहे.

मतकरींच्या गूढकथा खूप लोकप्रिय झाल्या. त्यांनी मराठी साहित्याच्या क्षेत्रात गूढकथांच्या निमित्ताने वेगळा प्रयोग केला आणि तो यशस्वीही झाला. त्यांच्या गूढकथा या रहस्यकथा नव्हत्या तर त्यांनी सामाजिक अंगाने मानवी जीवनातली गूढता पकडण्याचा प्रयत्न केला. मतकरींनी अगदी कोवळ्या वयापासून लेखनाला सुरूवात केली. वयाच्या सोळाव्या वर्षापासून सुरू झालेली त्यांची ही लेखनसाधना 80 व्या वर्षापर्यंत अविरत सुरू होती. ते गेली साठ ते पासष्ट वर्षं सातत्याने लेखन करत होते. त्यांच्या लेखनात कधीही खंड पडला नाही. हाडाचा लेखक नेहमी लिहित असतो. मतकरीही असेच हाडाचे लेखक होते. त्यामुळे त्यांचं लेखन कधीही थांबलं नाही. मतकरी आपल्या विचारांवर ठाम राहिले. त्यांच्या वैचारिकतेत कधीही चलबिचल झाली नाही. मतकरी हे खूप मोठे साहित्यिक होते. मात्र त्यांना योग्य तो मानसन्मान देण्यात आम्हीच कमी पडलो.

महाराष्ट्राने तसंच महाराष्ट्रातल्या विविध साहित्य संस्थांनी त्यांना एक साहित्यिक म्हणून पुरेसा मानसन्मान दिला नाही, ही खंत माझ्या मनात आहे. आम्ही त्यांना कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे भरवण्यात येणार्या कोकण मराठी साहित्य परिषदेचं अध्यक्षपद दिलं होतं. त्यावेळी त्यांनी अगदी उत्तम भाषण केलं होतं. साहित्यक्षेत्रातल्या राजकारणापासून ते शंभर योजनं दूर होते. राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यामुळे तशा पध्दतीने वावरण्याचं त्यांच्या मनातही कधी आलं नाही. तो साहित्याला समग्र वाहून घेणारा लेखक होता. मतकरी हे सामाजिक भान असणारे लेखक होते. त्यांनी कामगारांसाठी बरंच काम करून ठेवलं आहे. त्यांनी कामगार वस्तीत नाटक शाळा काढली होती. कामगारांसाठी नाट्य शिबिरांचंही आयोजन करायचे. कामगारांची नाटकं कशी होतील हे पहायचे. ते नाटक या माध्यमातून समाजाचा पुरोगामी दृष्टीने विचार करायचे.

मतकरींच्या रुपात एक चांगला, गुणवान लेखक आपल्याला सोडून गेला. माझे आणि मतकरींचे खूप जवळचे संबंध होते. आमची चांगली मैत्री होती. मतकरी अत्यंत स्वाभिमानी होते. आपल्या विचारांशी तडजोड करणं त्यांना कधी जमलं नाही. मात्र ते खूप निगर्वी आणि सरळ स्वभावाचे होते. गेल्या अनेक वर्षांपासूनचे संबंध असल्यामुळे त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी मनात रूंजी घालत आहेत. अशीच एक खास आठवण इथे नमूद करावीशी वाटते. ते एकदा कोकणात माझ्या गावी आले होते. कणकवलीला माझ्या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या नाट्य शिबिराच्या निमित्ताने त्यांचं येणं झालं होतं. त्यावेळी आमच्यासोबत त्यांचे सासरे आणि प्रसिद्ध समीक्षक माधव मनोहरही होते. त्यावेळी पर्यटनाच्या निमित्ताने आम्ही बरंच हिंडलो होतो. मी माझ्या पुस्तकातही या प्रसंगाचा उल्लेख केला आहे.

माधव मनोहर हे मार्क्सवादी म्हणजे डाव्या विचारसरणीचे. त्यावेळी माधव मनोहरांच्या पत्नी म्हणजे मतकरींच्या सासूबाईही आमच्यासोबत होत्या. माधव मनोहर हे आमच्यापेक्षा खूपच ज्येष्ठ होते. कणकवलीत कुणकेश्वर नावाचं अत्यंत सुंदर असं शंकराचं मंदिर आहे. आम्ही या मंदिरात गेलो.
माधव मनोहर डाव्या विचारसरणीचे असल्यामुळे देवाला नमस्कार करणार नाहीत, असं मला वाटलं. त्यावेळी मतकरी माझ्यासोबत होते. तो सोमवारचा दिवस होता. शिवमंदिरात शंकराची शास्त्रोक्त पूजा करण्यात आली होती. शंकराच्या पिंडीवर बिल्वपत्रं अर्पण करण्यात आली होती. माधव मनोहरांनी मंदिरात साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी मतकरी मला म्हणाले, हे आमचे सासरे इतके पुरोगामी आणि डाव्या विचारांचे पण मंदिरात चक्क ओंडवे झाले. मग आम्ही माधव मनोहरांना याबाबत विचारलं. त्यावर मी देवळात देवाच्या भावनेने गेलो नव्हतो. पण इथलं शांत वातावरण आणि बिल्वपत्रं वाहिलेली शंकराची पिंड बघून मला वाटलं की नमस्कार करावा. नमस्कार करताना मनात कोणतीही धार्मिक भावना नव्हती, असं ते म्हणाले. मतकरीही मिश्किल स्वभावाचे. माझ्या सासर्यांच्या अशा स्वभावामुळेच मी त्यांच्या मुलीशी लग्न केलं, असं म्हणत त्यांनी हंशा पिकवला. असा अत्यंत साधा, लोकांमध्ये अगदी सहज मिसळणारा हा लेखक होता. मतकरींनी मुंबईत हॉर्निमन सर्कल परिसरातल्या खुल्या मंचावर कामगारांच्या नाटकांचे प्रयोग केले होते. अनेकांना हे माहीत नसावं. रत्नाकर मतकरी हा नाटककार म्हणून अगदी वेगळ्या विचारांचा माणूस होता. मतकरींशी सारखं बोलणं व्हायचं. सतत भेटी व्हायच्या. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या या आठवणी संपणार नाहीत. लेखणी थांबणारही नाही.

व्यक्तिगत पातळीवर आमचे खूप जवळचे संबंध होते. तसं पहायला गेलं तर आम्ही समकालिन. मतकरी माझ्यापेक्षा वयाने लहान. मी त्यांच्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी मोठा. त्यामुळे आम्ही साहित्याच्या समकालिन वातावरणात वावरलो. ते कथेकडे फारसे वळले नाहीत. मी कथेकडे वळलो आणि ते नाटकांकडे वळले. आमच्या चर्चा खूप व्हायच्या. माझ्या ‘माहिमची खाडी’ या कादंबरीवर त्यांनी एकांत लिहिला होता. संपूर्ण कादंबरी एका एकांतात आणणं नक्कीच सोपं नव्हतं. पण मतकरींनी ते करून दाखवलं. त्यांचं नाट्यकौशल्य खरंच खूप अद्भूत होतं. मतकरी गेल्यामुळे माझा एक चांगला मित्र गेला. आता या आठवणी उरल्या आहेत. मतकरी माझे सुहृद होते. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्याचं फार मोठं नुकसान तर झालं आहेच पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या