Type to search

फिचर्स संपादकीय

ऑनलाईन ‘दरी’ कमी होईल का ?

Share

माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीनंतर आता इंटरनेट ही मूलभूत गरज झाली आहे. इंटरनेट वापराच्या अतिरेकाविषयी हल्ली खूप बोलले जाते, परंतु इंटरनेट ही गरजेची आणि उपयुक्त गोष्ट असल्याचे नाकारताही येत नाही. जग जोडून ठेवण्याचे काम इंटरनेटद्वारे केले जाते आहे. स्त्रियांच्या समानतेच्या गप्पा आपण मारत असलो तरीही कमी-अधिक प्रमाणात सर्व आघाड्यांवर उपेक्षा आणि असमान असणारी स्त्री इंटरनेटच्या जगाशी स्वतःला जोडून घेण्यात मागे पडते आहे. ही बाब नक्कीच चिंतनीय आहे.

विजयालक्ष्मी साळवी

देशात इंटरनेट सेवांचा विस्तार वेगाने होत आहे. पुरुष आपल्या कामाव्यतिरिक्तही इंटरनेटचा सातत्याने वापर करताना दिसतात. त्यामुळेच देशातील प्रत्येक स्त्रीने मग कोणत्याही वयाची असो तिने स्वतःला डिजिटल जगाशी जोडून घेणे आवश्यक आहे. तांत्रिक माध्यमातून जी माहिती मिळेल ती त्यांना सशक्त, सजग आणि जागरुक करू शकते. देशाच्या लोकसंख्येत महिलांची संख्या निम्मी आहे. पण इंटरनेटच्या वापराबाबत मात्र महिला अजूनही पिछाडीवरच असल्याचे दिसते. महिलांमध्ये तांत्रिक ज्ञान वाढण्याची गरज आहे. या संदर्भातच नुकतेच फेसबुकने महिलांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशामध्ये ‘वुई थिंक डिजिटल’ नावाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. फेसबुक, राष्ट्रीय महिला आयोग आणि सायबर पीस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम चालवला जात आहे.

त्याअंतर्गत सात राज्यांमध्ये एक लाख महिलांना डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण देण्यात येईल. कार्यक्रमाची घोषणा गेल्या वर्षीच्या दक्षिण आशिया सुरक्षा संमेलनाच्या दुसर्‍या संमेलनात करण्यात आली होती. उत्तर प्रदेशापासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे आणि पुढे आसाम, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार आदी राज्यांमध्येही त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. जेणेकरून महिलांना इंटरनेटच्या मदतीने समान आर्थिक संधी, शिक्षण आणि समाजाशी निगडीत राहण्याची संधी मिळेल. डिजिटल साक्षरता वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचा पुढाकार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने या अर्ध्या लोकसंख्येला अधिक ताकदवान आणि जागरुक करण्याची सुरुवात आहे.

डिजिटल युगातील हे तांत्रिक प्रशिक्षण महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.आजही देशातील महिला तंत्रज्ञान आणि डिजिटल जगापासून लांबच आहेत. ग्रामीण भागात तर महिलांच्या मोठ्या लोकसंख्येला डिजिटल दुनियेचा परिचयही नाही. वास्तविक सध्या देशात बहुतेक सर्वांच्या हाती स्मार्टफोन्स आहेत आणि इंटरनेट डेटा प्लानही स्वस्त आहेत. तरीही देशातील महिला मात्र इंटरनेटच्या वापरामध्ये पिछाडीवरच आहेत. जागरुकता, आवड, चर्चा आणि सातत्याने नवीनतम येणार्‍या सूचना, माहितीने अद्ययावत होणार्‍या जगामध्ये देशातील अर्धी लोकसंख्या आजही पूर्णपणे सामील नाही.निल्सन होल्डिंग्जबरोबर इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या इंडिया इंटरनेट 2019 मध्ये असे सांगितले गेले आहे की, इंटरनेटच्या वापराचा वेग वाढला आहे तरीही इंटरनेटच्या वापरामध्ये लैंगिकच्या दृष्टीने फरक दिसून येतो. देशातील तब्बल 25.8 कोटींपेक्षा जास्त पुरुष इंटरनेटचा वापर करतात. पण महिलांची संख्या त्या तुलनेत अर्धीच आहे.

शहरी भागात इंटरनेटचा वापर करणार्‍या 62 टक्के पुरुषांच्या तुलनेत 38 टक्के महिला आणि ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर करणार्‍या 72 टक्के पुरुषांच्या तुलनेत केवळ 28 टक्के महिलाच इंटरनेटचा वापर करतात. स्त्रियांच्या इंटरनेट वापराच्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकची ही मोहीम स्त्रियांना इंटरनेटसारख्या तांत्रिक विश्वाशी जोडण्यात प्रभावी भूमिका निभावू शकते. इंटरनेट उपयोगात आपला देश चीननंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. देशातील सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येविषयी आईएएमएआयच्या पहिल्या अहवालात हे स्पष्ट झाले आहे की पुरुषांच्या तुलनेत इंटरनेटच्या वापरामध्ये महिला अजूनही खूप मागे पडल्या आहेत.ग्रामीण भारता मध्ये डिजिटल जगामध्ये लैंगिक असंतुलन दूर करण्यासाठी गुगल आणि टाटा ट्रस्टने इंटरनेट साथी या योजनेअंतर्गत महिलांना इंटरनेटचा वापर करण्यासाठी प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली होती. डिजिटल साक्षर झालेल्या या महिला आपल्या समाजाला आणि आसपासच्या गावातील अन्य महिलांनाही प्रशिक्षण देऊन शिक्षित करतात.

महिलांना डिजिटल साक्षर करण्यासाठीचे असे कार्यक्रम खूप महत्त्वाचे आहेत कारण डिजिटल विश्वाशी जोडले गेल्यास महिलांना अनेक आघाड्यांवर स्वयंपूर्ण आणि सशक्त होण्यास त्याची
मदतच होणार आहे. इंटरनेटच्या वापरात महिला आणि पुरुष यांच्यात ऑनलाईन दरी असण्यामागे अनेक कारणे आहेत. भारतीय समाजात घरी आणि बाहेर अशा दोन्ही आघाड्यांवर लढणार्‍या महिलांचे प्राधान्यक्रम पुरुषांपेक्षा कितीतरी निराळे असतात. ग्रामीण महिलांमध्ये डिजिटल साक्षरतेची कमतरता आहे तर दुसरीकडे शहरी महिला सायबर शोषणामुळे त्या या जगापासून दूर जातात. इंटरनेटच्या जगात महिलांबरोबर होणारी गैरवर्तणूक आणि सुरक्षेशी निगडीत समस्याही महिला वापरकर्त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची समस्या आहे. देशातील अनेक भागांमध्ये तासन् तास पायी चालत जाऊन पिण्याचे पाणी भरणे किंवा शेती, शेतातील मजुरी करण्यापासून घरातील सर्व जबाबदार्‍या सांभाळणार्‍या कष्टकरी
महिलांना इंटरनेटच्या विश्वाशी जोडून घेण्याची संधीच मिळू शकत नाही. देशात निरक्षर महिलांची संख्या आणि आर्थिकदृष्ट्या घरातल्या पुरुषांवर अवलंबून असणार्‍या महिलांची संख्याही मोठी आहे. अनेक घरांमध्ये महिलांना इंटरनेट वापराचे स्वातंत्र्य मिळत नाही.

अनेक गावांमध्ये मुलींना स्मार्टफोन्सचा वापर करू न देण्याचे आदेश गाव पंचायतीने काढले आहेत. देशाच्या प्रत्येक भागात, प्रत्येक स्तरावर इंटरनेट या माध्यमाचे महत्त्व सांगितले पाहिजे, त्याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली पाहिजे. आजच्या युगामध्ये आपले मत मांडणे आणि माहिती मिळवण्यासाठीही महिलांनी इंटरनेटशी निगडीत राहणे आवश्यक आहे. महिला आणि मुली यांना शिक्षण आणि आरोग्याशी निगडीत जरुरी योजना, संस्था यांच्याविषयीची माहिती डिजिटल माध्यमांच्या मदतीने मिळवणे नक्कीच सोपे जाईल. इंटरनेट हे माहिती आणि संवादाचे सहज आणि वेगवान माध्यम आहे. माहितीच्या आणि सजगतेच्या या युगात तर इंटरनेट हा आपला मदतनीस आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

कारण माहितीचा शोध आणि नवीन माहितीची उपलब्धता, माहिती साखळी याच्या मदतीने जगातील लोकांना एकमेकांशी जोडून ठेवण्यास मदत होते. त्याबरोबर विविध बातम्यांची पोच तसेच एकमेकांची खुशाली जाणून घेण्याचे सक्रिय माध्यम म्हणून इंटरनेटकडे पाहता येऊ शकते. इंटरनेटच्या वापराने वापरकर्त्याच्या माहितीत भरच पडते. आपल्याकडे महिलांच्या मोबाईल, समाज माध्यमे वापरणे आणि घराकडे दुर्लक्ष होणे याची सांगड घालून विनोद रचण्यात कोणाचा हात धरता येणार नाही. परंतु या नव्या अहवालातून महिलांचा इंटरनेट वापर अत्यंत कमी असून आजही प्राधान्यक्रम हे घरातील कामालाच देण्याची त्यांच्याकडून अपेक्षा केली जात असल्याची दुसरी बाजूही या अहवालातून स्पष्ट होते आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!