Type to search

maharashtra फिचर्स संपादकीय

प्रेरणादायी बीजमाता !

Share

पद्मश्री जाहीर झालेल्या राहीबाई सोमा पोपेरे यांचा जन्म अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील एका आदिवासी शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांची गरीब परिस्थिती आणि घरी सात भावंडे असल्याने राहीबाईंना शाळेत घातलेच नाही. घरी आई वडिलांसोबत त्या शेतामध्ये मदत करू लागल्या. बालपणापासूनच शेतीची आवड असलेल्या राहीबाईंना वयाच्या बाराव्या वर्षीच लग्न होऊन सासरी जावे लागले.

सासरी आल्यानंतर पती सोमा यांचे सोबत त्या शेतात राबू लागल्या. सुरुवातीला रासायनिक शेतीकडे कल असल्याने त्यांनी या शेतीचा अनुभव घेऊन पाहिला. घरातील वाढते आजारपण व दवाखान्यावर होणारा बेसुमार खर्च याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की संकरित वाणांना उत्पादन जरी जास्त येते तरी उत्पादन खर्चही मोठा होतो. रासायनिक औषधे व कीटकनाशके मोठ्या प्रमाणात वापरल्याने त्यांचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. त्यानंतर त्यांनी परस बागेत गावरान भाजीपाला उत्पादन घरी खाण्यासाठी घेण्यास सुरूवात केले. विविध प्रकारचे पारंपरिक बियाणे जमा करण्याचा त्यांना छंद होता. या जुन्या वाणांचा संग्रह करून शेतीमध्येही बदल घडवून आणला.

दरम्यान ‘बायफ’ या जागतिक दर्जाच्या संस्थेशी त्यांचा बचत गटांच्या माध्यमातून संबंध आला. महाराष्ट्र जनूककोश प्रकल्प या भागात नुकताच सुरू झाला होता. राहिबाईंचे पारंपरिक वाणांचे ज्ञान व बियाणे संग्रह याची नोंद घेऊन तिच्या घरातील एक छोट्या खोलीत बियाणे बँक बाएफ संस्थेचे अध्यक्ष गिरीश सोहनी यांच्या मार्गदर्शनाने 2016 मध्ये सुरू करण्यात आली. या बीज बँकेमार्फत पारंपरिक वाणांचा प्रचार व प्रसार राहीबाई करू लागल्या. आज या बीज बँकेत 54 पिकांचे 116 विविध प्रकारचे वाण उपलब्ध आहेत. यातील वाल आणि पावट्याच्या सुमारे 20 वाणांचा संग्रह आहे. हे सर्व वाण प्रोटीनयुक्त व कमी पाण्यावर येऊ शकणारे आहेत. यातील काही वाण तर हवेतील ओलाव्यावर येऊ शकतात. याशिवाय भात, नागली, वरई अशा सुमारे 30 विविध प्रकारच्या भाज्या, तेलवर्गीय पिके, तृण व गळीत धान्य असे विविध प्रकारचे वाण त्यांनी जतन करून अमूल्य असा ठेवा पुढच्या पिढीसाठी ठेवला आहे. या सर्व उपक्रमात बाएफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांची त्यांना मोलाची मदत झाली.

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात महिला बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक वाणांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला आहे. परसबागेत लागवडी योग्य गावरान बियाणे राज्याच्या कानाकोपर्‍यात त्यांनी पोहचवले आहे. कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेची स्थापना करून त्या मार्फत स्थानिक वाणांचे संवर्धन व प्रसार कार्य बाएफच्या मदतीने सुरू आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वसंतराव नाईक कृषी पुरस्कार, बायफचा राष्ट्रीय पातळीवरील आदर्श शेतकरी पुरस्कार, आदिवासी विभागाचा आदिवासी सेवक पुरस्कार, कृषी विभागाचा आदर्श शेतकरी जिल्हास्तरीय पुरस्कार, देशदूत-सार्वमतचा कर्मयोगिनी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
देशपातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारत सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाचा वर्ष 2018 चा नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बीबीसीने दोन वर्षांपूर्वी जगातील 100 प्रतिभावान व प्रेरणादायी महिलांच्या यादीत त्यांचा समावेश केला होता. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली गेली.

राहीबाईंनी केलेल्या कार्याची दखल घेत प्रसिद्ध चित्रपट निर्माते अचुतानंद द्विवेदी यांनी त्यांच्या कार्यावर आधारित एक लघुपट तयार केला. या लघुपटाला नुकतेच फ्रान्स मधील कांन्स चित्रपट महोत्सवात तिसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कारही जाहीर झाला आहे.

पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या मराठीच्या पुस्तकात त्यांच्यावरील धड्याचा समावेश करण्यात आला आहे. अकोले तालुक्यातील डोंगर दर्‍यातील कोंभाळणे सारख्या खेडे गावातील एका निरक्षर आदिवासी महिलेचा हा प्रवास थक्क करणारा तसेच प्रेरणादायी आहे. पद्मश्री पुरस्काराने त्या करत असलेल्या कार्यावर शासनाने शिक्कामोर्तब केले आहे.
– अमोल वैद्य

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!