Type to search

Featured फिचर्स संपादकीय

भारताला व्यापारसंधी

Share

कोणताही साथीचा आजार फायद्याचा नसतो. त्यामुळे अनेक बळी जातात, पण कधी-कधी वाईटातून चांगले होते असे म्हणतात. चीनमधील करोना विषाणूच्या थैमानामुळे भारतातील अनेक उद्योगांना फटका बसला आहे. तरीही काही उद्योगांचा मात्र फायदा होत आहे.

ओंकार काळे

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत होत्या. भारताचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळी तर जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती 70 डॉलर प्रतिपिंपाच्या पुढे गेल्या होत्या. त्याचवेळी महागाई वाढत होती. या परिस्थितीतून भारतीय अर्थव्यवस्था कशी बाहेर पडणार, याबाबत चिंता व्यक्त होत होती. नेमका त्याचवेळी चीनमध्ये करोना व्हायरसचा संसर्ग झाला. जगात भारत आणि चीन हे दोनच कच्च्या तेलाचे आयातदार मोठे देश आहेत.

चीनमध्ये करोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे शहरामागून शहरे रिकामी करण्यास सुरुवात झाली. एक-दीड कोटींच्या शहरात चिटपाखरूही नाही, अशी स्थिती झाली. त्यामुळे चीनने जागतिक बाजारात कच्च्या तेलाची मागणी घटवली. उत्पादन जादा आणि मागणी कमी या बाजारपेठेतल्या नियमाचा परिणाम लगेच जाणवला. कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्या. त्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला झाला. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या (आईए) अनुमानानुसार, यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय खप मागच्या वर्षीपेक्षा 4.35 लाख बॅरलने घटण्याची शक्यता आहे. ऊर्जा क्षेत्रातील अभ्यासकांच्या मतानुसार, याचा फायदा भारताला होणार आहे. मागच्या एका महिन्यात पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची घसरण झाली आहे. तसेच पुढच्या आठवड्यात पेट्रोलचे दर आणखी चार रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.

करोना व्हायरसमुळे बेंट क्रूडचे अर्थात कच्च्या तेलाचे दर प्रतिपिंप 56 डॉलरहून कमी होऊन आता 50 डॉलरवर येऊ शकतात. याचा फायदा भारतीय इंधन बाजाराला मिळणार आहे. आईएने जाहीर केलेल्या अहवालात 2020 च्या पहिल्या तिमाहीत पेट्रोल आणि इतर इंधनाची मागणी कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दशकभरातली ही पहिलीच वेळ असणार आहे, जेव्हा इंधनाची मागणी कमी होत आहे. खरे तर याच्या आधी आईएने अहवाल दिला होता तेव्हा इंधनाची मागणी मागच्या वर्षीच्या तुलनेत दिवसाला 8 लाख पिंपांनी वाढेल, असे सांगण्यात आले होते, मात्र करोना व्हायरसमुळे चीनमधे हाहाकार उडाला असताना चीनमधून इंधनाची मागणी कमी झाली आहे.

2011 नंतर पहिल्यांदा इंधनाच्या दराची मागणी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. इंधन उप्तादित करणार्‍या ओपेक राष्ट्रांकडून भारत आणि चीन मोठ्या प्रमाणावर इंधन आयात करतात. भारत आणि चीनच्या मागणीवर इंधनाचे दर ठरत असतात. करोना नियंत्रणात आणण्यात चीनला यश आलेले नाही. त्याचा थेट परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

आता तेल उत्पादक राष्ट्रांच्या संघटनेने कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक बाजारात दर स्थिर झाले आहेत. असे असले तरी जाणकारांच्या मते पुढच्या दहा दिवसांमध्ये इंधनाच्या दराबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकते. इंधनाचे दर कमी होणे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक ठरू शकते. असे असले तरी चीनमध्ये करोना व्हायरसने जास्त दिवस मुक्काम ठेवल्यास भारताला फटका बसू शकतो.

कारण त्यामुळे भारतातून होणारी निर्यात प्रभावित होऊ शकते. भारत आणि चीनमध्ये मोठा व्यापार आहे. त्यात आपण नव्वद अब्ज डॉलर्स किमतीच्या मालाची आयात करतो तर 15 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात करतो. पश्चिम बंगालमधून अनेक गोष्टी चीनला निर्यात होतात. त्याला फटका बसला असला तरी आता त्यातून सावरून वेगळ्या पर्यायांचा स्वीकार केला पाहिजे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!