Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedस्नेहाची शिदोरी, थेट गरजूंच्या दारी…

स्नेहाची शिदोरी, थेट गरजूंच्या दारी…

आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपल्यावर अनंत उपकार असतात. या समाजाचे आपण काही देणे लागतो, ही आपली शिकवण. या भावनेतूनच जळगाव येथील भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्यावतीने लॉकडाऊनच्या काळात गरीब व गरजू नागरिकांसाठी ‘स्नेहाची शिदोरी’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.

विलास बोडके,जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

- Advertisement -

एक तीळ सात जणांनी वाटून खाण्याची, आपल्याकडे असलेल्या एका भाकरीतील अर्धी भाकरी समोरच्या उपाशी माणसाला देण्याची आपली भारतीय संस्कृती. आपण ज्या सामाजात राहतो, त्या समाजाचे आपल्यावर अनंत उपकार असतात. या समाजाचे आपण काही देणे लागतो, ही आपली शिकवण. या भावनेतूनच जळगाव येथील भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्यावतीने लॉकडाऊनच्या काळात गरीब व गरजू नागरिकांसाठी ‘स्नेहाची शिदोरी’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनचे राज्यात तंतोतंत पालन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध उपाययोजना राबवित आहे.
हे करीत असताना जिल्ह्यातील कोणीही नागरिक उपाशी राहणार नाही, याकडेही प्रशासन जिल्ह्यातील गरीब व गरजू नागरिकांना अवघ्या पाच रुपयांत शासनाच्या शिवभोजन थाळीचा लाभ देण्यात येत आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे ज्यांचा रोजगारच बंद झाला आहे, अशा नागरिकांना दोनवेळेचे जेवण उपलब्ध व्हावे, याकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांना आवाहन केले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोणीही नागरिक उपाशीपोटी राहू नये, याकरिता उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

प्रशासनाच्या आवाहनास जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती भरभरुन प्रतिसाद देत असून दररोज सुमारे 10 हजारांपेक्षा अधिक गरजूंना मोफत जेवण उपलब्ध करुन देण्यात आले. त्यातील एक म्हणजे जैन इरिगेशन होय. लॉकडाऊनच्या काळात समाजातील तळागाळातील कुटुंबांना उपाशी झोपण्याची वेळ येऊ नये, त्यांना आपल्याकडून काही मदत व्हावी, हा उदात्त विचार जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन व जैन बांधवांनी केला. गोरगरिबांसाठी काही भोजनाची व्यवस्था व्हावी, त्यादृष्टीने जैन इरिगेशन ‘स्नेहाची शिदोरी, थेट गरजूंच्या दारी’ हा आगळा-वेगळा उपक्रम 2 एप्रिलपासून राबवित आहे. या उपक्रमांतर्गत सकाळच्या जेवणात कडधान्याची भाजी, चार चपाती असे सुमारे 5500 अन्नाची पाकिटे तर सायंकाळी मसाला भाताची सुमारे 3500 पाकिटे गरजवंतांपर्यंत संस्थेच्या माध्यमातून पोहोचविले जात आहेत. आजमितीस सुमारे दोन लाख जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.

महत्त्वाचे म्हणजे जे कोरोना वॉरियर्स आहेत; त्यातले पोलीस, नर्स, डॉक्टर व अत्यावश्यक सेवा बजावणार्‍यांपर्यंत जैन कंपनीचे हेल्थ ड्रिंक, विविध फळांचा ज्यूसदेखील पाठविला जात आहे. अन्नाची पाकिटे पोहोचविण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवक शहरातील झोपडपट्टी, अनाथालये, वृद्धाश्रम आदी ठिकाणी दुपारच्या व रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत ही पाकिटे पोहोचवितात. शहराच्या कानाकोपर्‍यांत असलेल्या गरजवंतांपर्यंत अवघ्या तास दीड तासात ही ‘स्नेहाची शिदोरी’ संस्थेमार्फत पोहोचविली जात आहे.याशिवाय जिल्ह्यात व शहरातही अनेक संस्था गरजूंना मदत करीत आहे. नाथ फाउंडेशनच्यावतीने शहरातील निवारागृहातील मजुरांना जेवण व इतर मदत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

तसेच रेडक्रॉस सोसायटी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, व्यंकटेश देवस्थान, रोटरी क्लब, भरारी फाउंडेशन, संपर्क फाउंडेशन, रॉबिनहूड फाउंडेशन, मणियार बिरादरी, विश्व मानव रुहानी केंद्र, अमर शहीद संत कवरराम ट्रस्ट, शिवसह्याद्री प्रतिष्ठान, नशिराबाद, अलफैज फाउंडेशन या व इतरही अनेक सेवाभावी संस्था, सामजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी हे शंभर ते एक हजारापर्यंत जेवणाची पाकिटे गरजूंना दररोज वाटप करीत आहे. या विविध संस्थांच्या माध्यमातून जळगाव शहरात दररोज 10 हजारांपेक्षा अधिक गरजू व गरिबांना जेवणाच्या पाकिटाचे वाटप करुन त्यांची भूक भागविली जात आहे.
तसेच लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये, याकरिता शहरातील ज्या भागात गरजू व गरिबांना जेवणाची आवश्यकता असेल, तेथील दैनंदिन माहिती घेऊन त्याठिकाणी सामाजिक संस्थामार्फत जेवण पाठविण्याचे नियोजन नोडल अधिकारी प्रसाद मते हे या संस्थांशी संपर्क करुन करीत आहेत. तसेच त्याठिकाणी वेळेवर जेवण पाठविण्यासाठी त्यांची टीम झटत आहे.

याचबरोबर जिल्ह्यातील गरजवंतांना जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप करुन अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आपले योगदान देऊन सेवाभाव जपत आहे. हे सर्व करीत असताना लॉकडाऊनच्या नियमांचा कुठलाही भंग होणार नाही किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, त्यांचेही पालन करण्यावर या संस्थांचा भर आहे. या संस्थांचा सेवाभाव तसेच जेवण बनविण्याची पध्दत, जेवणाचा दर्जा, स्वच्छता, वाटपाची पध्दत जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन या संस्थांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या