Type to search

फिचर्स संपादकीय

‘भरारी’मागचे रहस्य

Share

विमानतळ विकासासारख्या क्षेत्रात परकीय गुंतवणुकीतील धोरणसातत्यामुळे परकीय गुंतवणुकीतून अगोदर मोठी आणि नंतर छोटी विमानतळे विकासासाठी घेतली गेली. आता तर त्यात आंतरराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला लागल्या आहेत.

कैलास ठोळे

देशांतर्गत हवाई वाहतूक आणि विमानतळ पायाभूत क्षेत्रात अगोदर 49 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर त्यात वाढ करण्यात आली. देशात पायाभूत क्षेत्रातली तूट गतिशील आर्थिक विकासात अडथळा आणत असून हा अडथळा दूर करण्यासाठी डॉ. सिंग आणि मोदी यांच्या सरकारने प्रयत्न केले. देशात जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे आवश्यक आहे, मात्र ही गरज केवळ एकट्या सरकारकडून पूर्ण होऊ शकत नाही. या क्षेत्रात विकास, खासगी क्षेत्राचा सहभाग आणि गुंतवणूक वाढावी म्हणून सरकारने विविध योजना आणि नियामक सुधारणा सुरू केल्या. खासगी सहभागाच्या माध्यमातून विमानतळाचा पायाभूत क्षेत्राचा विकास करण्यावर सरकारने भर दिला. सुरुवातीला शंभर ठिकाणी भागीदारीतून टर्मिनल बांधण्यात आले. देशातल्या खासगी आणि सरकारी भागीदारी प्रणालीवर आधारित पाच विमानतळे आता 57 टक्के प्रवासी आणि 70 टक्के मालवाहतूक हाताळत आहेत.

भारतातल्या विमानतळ विकासात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत, असे परदेशी कंपन्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी निविदा भरायला सुरुवात केली. काहींनी कामेही मिळवली. त्यात केवळ प्रगत देशांमधल्या कंपन्यांचा समावेश आहे असे नाही तर स्वीडनसारख्या देशातल्या मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे. झुरीच एअरपोर्ट इंटरनॅशनल नावाची एक कंपनी आहे. तिने दिल्लीनजीकच्या जेवार विमानतळाच्या विकासाचे काम घेतले आहे. एडीपी नावाचा हा उद्योग समूह जेवार विमानतळाच्या विकासात 49 टक्के गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी एकूण 10 हजार 780 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. केवळ दिल्लीनजीकचे विमानतळ विकसित करून ती थांबणार नाही तर हैदराबादच्या
विमानतळ विकासाचे कामही हीच कंपनी करणार आहे. एडीपी या परदेशी कंपनीने जीएमआर समूहाशी करार केला आहे.भारतात अलीकडच्या काही वर्षांमध्ये विमान वाहतुकीचे क्षेत्र प्रचंड गतीने वाढते आहे. आणखी पाच वर्षांमध्ये भारतातली विमान वाहतूक जगातली तिसर्‍या क्रमांकाची असेल. फक्त अमेरिका आणि चीन हे दोनच देश भारताच्या पुढे असतील. इंटरनॅशनल एअरपोर्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशननेच तसा अहवाल दिला आहे.

स्वीडन झुरीच एअरपोर्ट कंपनीने जेवार विमानतळ विकासाचे काम मिळवले तेव्हा स्पर्धक कंपन्यांची संख्या कमी नव्हती. पाच-सहा मोठे स्पर्धक काम मिळवण्याच्या स्पर्धेत होते. तरीही स्वीडन झुरीच एअरपोर्ट आणि जीएमआर या कंपनीने भागीदारीत ते काम मिळवले. बंगळुरूच्या विमानतळाचे काम कॅनडास्थित प्रेम वात्सा यांच्या फेअरफॅक्स इंडिया होल्डिंग्ज कॉर्पोरेशन या कंपनीने तीन वर्षांपूर्वीच मिळवले. इक्रा नावाच्या एका संस्थेने भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात म्हणजेच प्रवासी वाहतुकीत साडेचार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. मंदी असतानाच्या काळातही विमान वाहतूक क्षेत्राला फटका बसलेला नाही, हेही आकडेवारी स्पष्ट करते. अर्थात, गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत विमान वाहतुकीच्या क्षेत्रातली वाढ कमीच आहे. यापूर्वीच्या सहा वर्षांमध्ये विमानांच्या प्रवासी वाहतुकीत दोन आकडी वाढ नोंदवली गेली होती. भारतात अजूनही विमानाने प्रवास करणार्‍यांची संख्या कमीच आहे.

पण विमानांच्या तिकिटांचे बुकिंग फार अगोदर केले तर रेल्वे प्रवासापेक्षाही स्वस्त पडत असल्याने प्रवासी तिकडे वळायला सुरुवात झाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी ही बाब लक्षात घेतली आहे. विमानतळ विकासाची कामे करणार्‍या वेगवेगळ्या संस्था आता परस्परांना प्रतिस्पर्धी मानत नाहीत. त्या हातात हात घालून भागीदारीत गुंतवणूक करतात. भूसंपादनासह अन्य कामे सरकार अधिक गतीने करून देते. त्यामुळे कामे अधिक गतीने करणे शक्य होत आहे.

भारतात सध्या 464 विमानतळे आहेत. त्यापैकी 125 विमानतळे एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या ताब्यात आहेत. या विमानतळांवरून 78 टक्के देशांतर्गत वाहतूक तसेच 22 टक्के आंतरराष्ट्रीय वाहतूक चालते. गेल्या वर्षात 3 कोटी 16 लाख प्रवाशांनी विमानाने प्रवास केला. देशांतर्गत प्रवासी वाहतुकीपेक्षा आंतरराष्ट्रीय प्रवास करणार्‍यांच्या संख्येत जास्त वाढ झाली.

अहमदाबाद, गोवा, नागपूर, मुंबई, दिल्ली या गर्दीच्या विमानतळांच्या विकासासाठी जास्त कंपन्या गुंतवणूक करायला तयार आहेत. भारतीय हवाई क्षेत्रात गुंतवणुकीच्या अनेक संधी असून आता तर कार्गो विमानतळांची वाढती मागणी लक्षात घेता अनेक परकीय कंपन्या त्यात रस दाखवण्याची
शक्यता आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!