कापूरवाडीत विदेशी पाहुण्यांचे आगमन

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जवळील कापूरवाडी येथील निळ्याशार जलाशयावर देशी-विदेशी पाहुण्यांच्या आगमनाला थंडीच्या दिवसांत सुरुवात होत असते. पक्षी दिनाच्या निमित्ताने रविवारी झालेल्या पक्षी निरीक्षणात सुमारे 30 प्रकारच्या रंगी-बेरंगी पक्ष्यांची नोंद करण्यात पक्षी मित्रांनी केली आहे. थंडीत वाढ झाल्यानंतर आणखी पक्षी येथे स्थलांतर करणार आहेत. त्यामुळे या जलाशयावर सतत पक्षी मित्र, अभ्यासक आदी भेट देत असतात. त्याच प्रकारे जिल्ह्यातील सुमारे 70 पक्षी मित्रांनी येथे भेट देऊन पक्षी निरीक्षण करून निष्कर्ष विषद केले.
विदेशी रंगी-बेरंगी आकर्षक पक्षांचे विहरण्यासाठी असलेले आवडते ठिकाण म्हणजे कापूरवाडीचा विस्तीर्ण पसरलेला निळाशार जलाशय होय. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे तलावातील पाणीसाठा घटला होता. यामुळे विदेशातून येणार्‍या पाहुण्यांची संख्या घटली होती. मात्र, यावर्षी पाऊस अधिक झाल्याने कापूरवाडी तलावात पाणीसाठा वाढला आहे. देशातील विविध भागांतून तसेच थेट विदेशातून येणार्‍या रंगी-बेरंगी पाहुण्यांनी तलाव बहरू लागला आहे.
पक्षी दिनाचे औचित्य साधून नगर जिल्ह्यातील पक्षी अभ्यासक व निसर्ग मित्र मंडळ यांच्यावतीने पक्षी निरीक्षणाची मेजवानी आयोजित करण्यात आली होती.
तलावाच्या भिंतीजवळ असणार्‍या झाडांवर युरोपातून आलेल्या पळस मैना पक्षांच्या थव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याचवेळी गुलबस पायांच्या आणि शिडशिडती बांध्याच्या शेकात्या पक्ष्यांनी तलावाच्या काठावर हजेरी लावली.
यावेळी पक्षी अभ्यासक डॉ. सुधाकर कुर्‍हाडे व कार्तिक स्वामी इंगळे यांनी पक्षी दिनाची माहिती दिली. तसेच मार्गदर्शन केले. टेलिस्कोप लाऊन सर्वांनी पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला. पक्षीमित्र तथा भारतीय कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भोसले, शाम भंडारी, विलास पाटील, राजेंद्र स्वामी, विजय देवचके, संध्या कुर्‍हाडे, अरविंद गोरेगावकर, डॉ. बागुल, यावेळी उपस्थित होते.

लडाख वरून येणारे चक्रवाक, युरोपातील तलवार बदक, चित्र बलाक, चमचे, राखी बगळे, लालसरी बदक, चांदवा, पानडुबी,धोबी, खंड्या, हुप्पो ,खाटिक, कोतवाल, मुनिया, वेडे राघू, साथभाई, चीरक, मैना आदी पक्ष्यांचे आगमन झाले आहे.

LEAVE A REPLY

*