डॉ. कांडेकरांना दिली धमकी; धमकी देणारा ‘छोटा शकील’ अटकेत

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉ. बापूसाहेब कांडेकर यांना छोटा शकील नावे फोन करून खंडणी मागणार्‍या आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीच्या मावशीच्या हृदयविकाराच्या उपचाराचे बिल डॉक्टर कांडेकर यांनी कमी केले नव्हते. याचा राग मनात धरुन हा प्रकार केल्याची कबुली आरोपी नितीन मधुकर भोस (रा. निमोण, ता. शिरूर, जि. पुणे) याने दिली आहे. त्याला वाळकी येथून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून मोबाईल व एक सीमकार्ड जप्त करण्यात आले आहे.
मंगळवारी (दि.11) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉ. कांडेकर यांच्या नावे फोन आला.मी छोटा शकील बोलतो आहे. ‘50 लाखा रुपये दे नाहीतर तुझा गेम करू’ अशी धमकी त्यांना देण्यात आली. हा प्रकार एकदाच नाही, तर आठ ते दहा वेळा एकाच मोबाईल नंबरहून झाला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी डॉ. कांडेकर यांना साध्या वेशातील सुरक्षा पुरविली.
गुन्ह्याची उकल करण्यासाठी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक आरोपीच्या मागावर होते. सोमवारी आरोपी हा नगर तालुक्यातील वाळकी येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना समजली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले यांचे पथक आरोपीच्या मागावर पाठविले. आरोपी भोस दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वाळकीत आला असता पोलिसांनी त्यास सापळा रचून ताब्यात घेतले.
आरोपीस गुन्ह्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, रांजणगाव गणपती येथे भोसची मावशी राहते. तिला आठ ते दहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा त्रास झाला. तिला उपचारासाठी नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 14 ते 15 दिवस तिच्यावर उपचार करण्यात आला. उपचारापोटी खर्च 1 लाखा 80 हजार रूपये बिल झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे थोडीफार रक्कम कमी करावी अशी विनंती भोसेच्या नातेवाईकांनी केली. या दरम्यान नितीन भोसे हा तेथेच होता.
डॉक्टरांनी मावशीच्या उपचाराचे बिल कमी केले नाही याचा राग त्याला आहे. दरम्यान, बिल भरुन मावशीला घरी नेण्यात आले. मात्र भोसेच्या मनात राग तसाच राहिला. हॉस्पिटलमधून जातांना त्याने एका चिठ्ठीवर हॉस्पिटलचा नंबर लिहुन घेतला होता. आठ ते दहा महिने तो नंबर जपून ठेऊन त्याने मंगळवारी अशा प्रकारचा रोष व्यक्त केला अशी माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार, राजकुमार हिंगोले, योगेश गोसावी, दत्ता हिंगडे, उमेश खेडकर, भगीनाथ पंचमुख, संदीप पवार, रावसाहेब हुसळे, रवी सोनटक्के, दिपक शिंदे, योगेश सातपुते, विनोद मासाळकर, संभाजी कोतकर, संदीप घोडके या पथकाने केली.

आरोपी जादुटोणा व गुप्तधनाचा छंदी –
आरोपीला दुर्मिळ वस्तु खरेदी विक्री करण्याच्या छंद आहे. त्यामुळे त्याच्यावर चार ते पाच लाखांचे कर्ज आहे. आकाशातून पडणारी वीज ज्या वस्तूवर पडते त्या वस्तू खरेदी करुन त्यांचा जादुटोणा व गुप्तधन शोधण्यासाठी वापर करणे अशा प्रकारचा छंद भोसेला आहे. त्यामुळे अशा वस्तू विकत घेण्यासाठी त्याने सहज पैसा मिळाला तर मिळाला या हेतून फोन करुन धमकाविण्याचा प्रयत्न केला आहे. अशी देखील माहिती चौकशीत पुढे आली आहे.

छोट्या शकीलशी कोणताही संबंध नाही –
आरोपी हा सराईत गुन्हेगार नाही. त्याच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात किरकोळ मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. छोटा शकीलच्या नावाची दहशत आहे. त्याला लोक घाबरतात. म्हणून शकीलच्या नावाचा वापर करण्यात आला. प्रत्यक्षात आरोपीचा खंडणीबहाद्दरांशी कोणताही संपर्क नाही. बील कमी केले नाही म्हणून अशा प्रकारचे कृत्य केले आहे. या घटनेमुळे डॉक्टरांमध्ये मोठे दहशतीचे वातावरण होते. ते निवळले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली.

LEAVE A REPLY

*