शेवगाव हत्याकांड : नेवाशाचा मुख्य आरोपी भोसले गजाआड

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेवगाव शहरातील विद्यानगर येथे राहणारे माजी सैनिक आप्पासाहेब हरवणे यांच्यासह चार जणांची हत्या करणारा मुख्य सूत्रधार परसिंग हरसिंग भोसले (रा. बाभूळखेडा, ता. नेवासा) या पाचव्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. भोसले याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

रविवारी (दि.18) विद्यानगर येथे अप्पासाहेब हरवणे यांच्यासह त्यांची पत्नी सुनंदा, मुलगी स्नेहल व मुलगा मकरंद यांची पाच दरोडेखोरांनी निघृण हत्या केली होती. या घटनेचा तपास करीत असताना पोलिसांनी यापूर्वी अल्ताप भोसले, उमेश भोसले, अमोल पिंपळे, रम्या भोसले अशा चौघांना अटक केली. यातील मुख्य आरोपी रम्या उर्फ रमेश याचा मित्र परसिंग भोसले हा अद्याप फरार होता. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेेष पथक त्याच्या मागावर होते. परसिंग हा कर्जत तालुक्यातील आकोणी येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक शरद गांगुर्डे यांचे पथकाला आकोणी शिवारात सापळा लावण्याचे आदेश दिले.

भोसले हा त्याच्या एका नातेवाईकाच्या घरात झोपलेला असताना पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकली. मात्र, तो सर्वांना हुलकावणी देऊन पसार झाला. घराच्या जवळच असणार्‍या शेतात गेल्यामुळे पोलिसांनी शेतात घुसूत त्याचा पाठलाग करत त्यास ताब्यात घेतले. वर्दीची भाषा दाखवताच आरोपीने शेवगाव येथील चौघांची हत्येची कबुली दिली.

रम्या व परसिंग ही दोघे टोळीचे मोहरके असून त्यानी संगनमताने शेवगाव येेथे दरोडा टाकण्याचा कट रचला होता, अशी कबुली भोसले याने दिली आहे. या पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळावी म्हणून त्यास रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या कामगिरीत सुनिल पवार, उमेश खेडकर, अंकुश ढवळे, संदीप घोडके, संदीप पवार, विजय ठोंबरे, रावसाहेब हुसळे, मल्लिकार्जुन बनकर, रवी कर्डिले, मनोज गोसावी, गव्हाणे, बेरड, कोतकर सूरज वाबळे, किरण जाधव, नामदेव जाधव, विशाल दळवी आदी पथकाने केली.

परसिंग भोसले व रम्या भोसले हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर नगरसह नाशिक, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या दोघांना अटक करण्यात आल्यामुळे त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.  ज्यांच्यावर सात ते आठ खूनाचे व 10 पेक्षा जास्त दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारचे आरोपी नेवासा तालुक्यात राहतात, हे परसिंग हरसिंग भोसलेला अटक केल्यामुळे उघड झालेले आहे. याची भनक स्थानिक पोलिसांना होत नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात असून त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

LEAVE A REPLY

*