विद्यार्थ्यांना लुटणारी श्रीरामपूरची लखपती टोळी जेरबंद

0

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील विळद व एमआयडीसी परिसरातील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या घराच्या खोल्यांमध्ये प्रवेश करत त्यांचे साहित्या चोरणार्‍या श्रीरामपूरच्या लखपती  टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून लॅपटॉप, मोबाईल व दुचाकी वाहने असा लाखो रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

विराज माणिक मुठे (रा. मुठेगाव. ता. श्रीरामपूर), रोहीत सतीष परदेशी (रा. थत्ते ग्राऊंड, श्रीरामपूर), करण संजय तिरमखे (रा. सुभाष कॉलनी, श्रीरामपूर), मनोज रावसाहेब चव्हाण (रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर), बलराम उर्फ बल्ल्या रामचित यादव (रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर), संतोष विठ्ठल कुटे (रा. कामगार हॉस्पिटल, श्रीरामपूर) अशी सहा जणांची नावे आहेत.

विळद घाट परिसरात अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी येतात. कॉलेज जवळ पडावे यासाठी एमआयडीसी किंवा विळद परिसरात खोल्या भाड्याने घेतात. रात्रीच्यावेळी सर्व विद्यार्थी झोपल्यानंतर त्यांचे मोबाईल, लॅपटॉप तसेच अन्य साहित्य टेबलावर पडलेले असते. याचाच फायदा घेत त्यांच्यात राहणार्‍या एका मित्राने रुममधील सर्व साहित्य लुटण्याचा कट रचला होता. श्रीरामपूरच्या तरूणांची टोळी तयार करुन सहा जणांनी 20 ते 25 मोबाईल व दोन लॅपटॉप चोरून नेले. हा प्रकार विद्यार्थ्यांनी एमआयडीसी पोलिसांना सांगिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी गेल्याने पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणाचा तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू केला. आरोपी हे श्रीरामपूर येथील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यांनी एलसीबीचे एक पथक श्रीरामपूरला पाठवून सहा जणांना ताब्यात घेतले. सुरूवातीला आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास टाळाटाळ केली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखे बोलू लागले. त्यांच्याकडून 20 ते 25 मोबाईल, दोन लॅपटॉप व दोन वाहने असा लाखो रुपयांचा माल हस्तगत केला आहे. या सहा जणावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मन्सूर सय्यद, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, रवींद्र कर्डीले, शंकर चौधरी, सचिन अडबल, विजय ठोंबरे, भोपळे यांच्या पथकाने केली.

काय सापडले? –   लिनोव्हो, मोटोरोला, आयडीया, गेटवे, व्हिवो कंपन्यांचे 20 ते 25 मोबाईल व दोन दुचाकींसह अन्य लाखो रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीने या अगोदरही अशाच चोर्‍या केल्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही गुन्हे उघड होण्याचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

*