भोंदूबाबासह साथीदारास 7 दिवसांची पोलीस कोठडी

0

कर्जत (प्रतिनिधी)- काळी जादू दाखवून गुप्तधन मिळवून देतो, असे म्हणून राज्यात व परराज्यामध्ये 25 कोटींपेक्षा जास्त रकमेला गंडा घालणार्‍या मध्यप्रदेश येथील अब्दूल जावेद अब्दुल समी (वय 48), भारत मुरारी धिंडोरे (वय 40, रा. रेल्वेकॉलनी दौंड जिल्हा पुणे) या दोघांना कर्जत येथील प्रथम न्यायदंडाधिकारी आविनाश माळवदे यांनी 17 ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तपासी अधिकारी सुनिल माळशिकारे यांनी दिली.

शुक्रवारी (दि.11) रोजी बाळू लक्ष्मण पवार (रा. भांडेवाडी, ता. कर्जत) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भोंदू बाबा व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्जतचे उपविभागीय पोलीस आधिकारी सुदर्शन मुंडे व पोलीस निरीक्षक वसंत भोये यांचे मार्गदर्शनाखाली हेडकॉन्सटेबल जयसिंग शेेलार व गणेश ठोंबरेे यांनी भोंदूबाबा व त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. या दोघांचा विक्रम जयसिंग पवार हा साथीदार मात्र पसार झालेला आहे. अब्दुल जावेद अब्दूल समी व भारत मुरारी धिंडोरे तसेच विक्रम पवार या तिघांचे राज्यात मोठे रॅकेट आहे. अनेक गावांमध्येएजंट आहेत. त्यांना कमीशन देऊन सावज गळाला लावले जात होते. शेेतात, घरामध्ये गुप्त धन आहे, आम्ही ते काढून देऊ मात्र त्यासाठी तुम्हाला खर्च येईल, असे सांगून घर व शेताची पहाणी करायचे. सुरुवातीला हे 11 हजार रुपयांपर्यंत काळ्या जादूसाठी पैसे घेत होते.

परिसरात एजंटांमार्फत धनवान माणसांची माहिती घेवून त्याला सावज करत. भोंदूबाबाचे साथीदार गुप्तपणे घरात किंवा शेतात खड्डा घेत. त्यातील एक जण ख्ड्डा करून तोंड बांधलेल्या हंड्यामध्ये एक काळ्या रंगाचा साप ठेवत. त्यानंतर भोंदूबाबा घरातील लोकांना घेऊन जाऊन तो हंडा ताब्यात घेतो. त्यातील साप बाजूला ठेऊन हंडा संबंधित घरातील प्रमुखाकडे देऊन हंडा उघडण्यास मज्जाव करतो. तुम्ही हंडा उघडून बघितला तर घरातील व्यक्ती मृत्यू होईल, अशी भिती घालत. दरम्यान हंड्यातून एक सोन्याचा तुकडा काढून संबंधितांना सोनाराकडे खात्री करून घेण्यास सांगितले जाते. असे करत धन खूप आहे, त्यासाठी आणखी पुजा करावी लागेल, असे सांगून 5 लाखांपासून 25 लाखांपर्यंत पैसे उकळले जात. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. पवार यांचीही अशाच पध्दतीने फसवणूक करून सुमारे 1 कोटी रुपये लुटले. त्यांच्या फियादीवरून दोन जणांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*