गावठी कट्टा व काडतुसांसह चिचोंडीत दोघांना अटक

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील बस स्थानकावर गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन स्थानिक तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे ताब्यात घेण्यात आली आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण अरुण दवणे व असिफ रफीक शेख (दोघे. रा. चिचोंडी पाटील) अशी आरोेपींची नावे आहेत.

बुधवारी (दि. 2) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांना माहिती मिळाली की, चिचोंडी पाटील येथे एक तरुण पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार आहे. पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांच्यासह पथकातील राजू वाघ, अभय कदम, भरत डोंगरे, गणेश डहाळे, सुरेश माळी, आनंद सत्रे यांना सापळा रचून आरोपींना अटक करण्याची आदेश दिले. परदेशी यांच्यासह कर्मचार्‍यांनी बसस्थानक परिसरात 1:30 वाजण्याच्या सुमारास सापळा रचला.

यादरम्यान आरोपी असिफ रफीक शेख घटनास्थळी आला असता त्याच्याकडे पिस्तुल असल्याची खात्री पोलिसांना झाली. मात्र त्याचा दुसरा साथीदार भूषण दवणे येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता शेखकडे एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे असा 46 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सायंकाळी दोघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*