साईआश्रमात चोरीच्या इराद्याने आलेल्या मुंबईच्या चोरट्यास अटक

0

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – साईबाबा विश्‍वस्त व्यवस्थेच्या साईआश्रम फेज वनमध्ये संशयीतरीत्या फिरणार्‍या मुंबई येथील तरुणास पकडून सुरक्षा विभागाच्या ताब्यात देण्यात आले. संशयित तरुणाकडून एक स्क्रू चावी, दोन हॅक्सॉ ब्लेड आढळून आले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मागे केलेल्या चोर्‍यांची कबुली दिली.

रविवार सकाळी 11 च्या सुमारास साईआश्रम बी इमारतमध्ये पहिल्या मजल्यावर मुंबई येथील सुधाकर गौतम कांबळे हा इसम संशयितरीत्या फिरत होता. संस्थानचे आऊटसोर्सिंग सुपरवायजर विश्‍वजीत बागूल यांनी त्यास विचारणा केली असता त्याची धांदल उडाली. त्यानंतर बागूल यांनी संरक्षण विभागास कळवून घटनास्थळी सुरक्षा कर्मचारी बोलावले. त्याची झाडाझडती घेतल्यावर त्याच्याजवळ 1 स्क्रू चावी, 2 हॅक्सॉ ब्लेड आढळून आले. त्याला जागेवर चोप दिल्याने मागील काळात केलेल्या चोर्‍यांची त्याने कबुली दिल्याचे सुरक्षा कर्मचार्‍याने सांगितले.

संबंधित इसम हा मुंबई येथील सायनचा रहिवासी असून तो शिर्डीत कोणाकडे वास्तव्यास आहे याचा तपास शिर्डी पोलीस करीत आहेत. संशयित इसमाकडे पॅनकार्ड आढळून आले. मंदिर सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गंगावणे यांनी सांगितले की मागे झालेल्या चोर्‍यांबद्दल आमच्या कर्मचार्‍यांना सतर्क राहण्याचे तसेच तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या कारवाईमुळे भविष्यात होणारा मोठा प्रसंग टळला असल्याचे गंगावणे यांनी सांगितले. याकामी सुरक्षा कर्मचारी रामदास धीवर, विश्‍वजीत बागूल यांचे अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

*