Type to search

आरोग्यदूत फिचर्स

आरोग्यदूत : गुडघ्याच्या संधिवातावर रामबाण उपचार

Share

डॉ. जयेश सोनजे
सांधेरोपण शस्त्रक्रिया व अस्थिरोग तज्ञ
वोक्हार्ट हॉस्पिटल, नाशिक

आपल्या कानावर बर्‍याचदा संधिवात, अर्थराइटिस, सांधेदुखी असे शब्द पडतात, पण या बद्दलची नेमकी आणि अचूक माहिती आपल्याला मिळत नाही आणि आजही समाजात या विषयी बरेच गैरसमज आहे. सांध्याच्या कुठल्याही दुखण्याला आपण संधिवात म्हणून संबोधतो, हे अगदी चुकीचे आहे. वास्तव्य असे आहे की, संधिवात हा एक रोग नसून, आपल्या जीवनशैलीचा परिणाम आहे. मुळात आपली जीवनशैली कशी आहे, त्यावर संधिवात आणि त्याचे प्रकार अवलंबून आहे. आधीच्या काळात पन्नाशी नंतर संधिवात होतो अशी समाज होती. पण आजच्या काळात जीवनशैलीतील बदलांमुळे असे काही समीकरण उरलेच नाही आणि संधिवात होण्याची वयोमर्यादा कमी होत चालली आहे. बर्‍याच लोकांमध्ये फार कमी वयात संधिवाताची सुरुवात आढळून येते. साधिवात म्हटले की, याचे खूप प्रकार असतात, याचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे ऑस्टिओआर्थराइटिस, हा जीवनशैलीतील बदलांमुळे होणार संधिवात असतो.

शरीरातल्या प्रत्येक सांध्यांच्या दोन्ही हाडांच्यामध्ये एक कार्टिलेजचा थर असतो ज्याला सामान्य भाषेत गादी किंवा कुर्चा म्हणतात. ह्या कार्टिलेजच्या थरामुळे दोन्ही हाडांमध्ये घर्षण होत नाही आणि सांध्यांची हालचाल सहज होते, कालांतराने कार्टिलेजचा थर घासला जातो आणि त्यामुळे सांध्यांचे हाडे आणि रक्तवाहिन्यांचे एकमेकांशी घर्षण होऊ लागतात आणि त्यावर सूजही येते, यालाच आमच्या वैद्यकीय भाषेत ऑस्टिओआर्थराइटिस असे म्हणतात. सामान्यतः ही स्थिती गुडघ्याच्या आणि खुब्याच्या सांध्यामध्ये अधिक आढळते, कारण या सांध्यांवर शरीराचे संपूर्ण वजन पडते परिणामी त्यांची झीज अधिक होते. आज-कालच्या अतिवेगवान जगात जीवनशैलीतील बदल जसे की, खाण्या-पिण्याच्या सवयी, लठ्ठपणा आणि काही जैविक तत्व सुद्धा याला कारणीभूत आहेत.

ऑस्टिओआर्थराइटिसची सामान्य लक्षणे म्हणजे सकाळी उठल्यानंतर गुडघा किंवा खूब आखडणे, वेदना होणे, सूज येणे, जळजळ होणे, पाय वळवता न येणे, पायात वाक येणे, परिणामी चालता ना येणे असे सगळे आहे. संधिवातामुळे अतिशय वेदना जाणवतात आणि सांध्यांची हालचाल मंदावते, परिणामी आयुष्याची गुणवत्ता कमी होते आणि तुम्हाला नित्याच्या आवडणार्‍या गोष्टी करणे शक्य होत नाही, उदा. चालणे, मांडी घालून बसणे, व्यायाम करणे, जिने चढणे, नातवंडांसोबत खेळणे.

ऑस्टिओआर्थराइटिसच्या उपचारांमधी सर्वात महत्त्वाचे असते त्याचे वर्गीकरण करणे. एक्स-रे किंवा एमआरआयच्या साहाय्याने झीज किती झाली आहे ते बघितले जाते, त्यानुसार सांध्याची झीज ही साधारणपणे चार टप्प्यांत होते. स्टेज 1 आणि 2 च्या ऑस्टिओआर्थराइटिसमध्ये औषोधोपचार आणि काही ठराविक व्यायामाच्या साहाय्याने उपचार केले जातात. पण जेव्हा औषोधोपचार आणि व्यायामांनी फरक पडत नाही आणि ऑस्टिओआर्थराइटिस स्टेज 3 किंवा 4 चा असतो तेव्हा, सांधेरोपण शस्त्रक्रिया करून घेणे हाच एक खात्रीशीर पर्याय आहे.

सांधेरोपण शस्त्रक्रिया किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये सांध्यांच्या दोन्ही हाडांना विशिष्ट आकार दिला जातो आणि त्याला इम्प्लांट बसवला जातो जो विशिष्ट धातू किंवा सिरॅमिकचा बनलेला असतो, त्यामध्ये गादीची पूर्तता करण्यासाठी आणि इम्प्लांटचे घर्षण थांबवण्यासाठी प्लास्टिकचा थर बसवला जातो. या शस्त्रक्रियेमध्ये सांध्याजवळचा कुठलाही स्नायू कापला जात नाही. या शस्त्रक्रियेमुळे वेदना नाहीश्या होतात आणि रुग्ण पूर्ववत आयुष्य जगू शकतात. वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक येथे सांधेरोपण शस्त्रक्रिया ही एका विशिष्ट पद्धतीने केली जाते ज्याला नोव्हो टेक्निक असे म्हणतात.

या पद्धतीने शस्त्रक्रिया करून घेतल्यास त्वचेवर लागणारा चीरा छोटा असतो, ऑपरेशनला लागणारा वेळ फार कमी असतो परिणामी रक्तस्त्राव कमी होतो, वेदना नाहीच्या बरोबर असतात, फिजिओथेरपीची गरज फार कमी असते आणि रिकव्हरी लवकर होते. सांधेरोपणानंतर सांध्यांच्या हालचालीतील सहजपणा वाढतो आणि जीवनाचा दर्जा सुधारतो. शिवाय, आजकालच्या या अतिवेगवान जगात आपल्याला स्वतःची काळजी घेण्यासाठी दुसर्‍यावर अवलंबून राहावे लागत नाही. सांधेरोपणानंतर पेशंट सर्व दैनंदिन कामे करू शकतात, ते जिने चढू शकतात, मांडी घालून बसू शकतात, व्यायाम करतात आणि भारतीय शौच पद्धतीमध्येसुद्धा बसू शकतात. म्हणून संधिवाताचे दुखणे अंगावर काढू नका, त्याचे उपचार घेतल्याने तुमचे उर्वरित आयुष्य अधिक सुखकर होऊ शकते, गरज आहे फक्त योग्य वेळेत डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्याची !

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!