Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedआरोग्यदूत : स्त्रियांचे आरोग्य आणि व्यायाम

आरोग्यदूत : स्त्रियांचे आरोग्य आणि व्यायाम

आपण सुंदर दिसावे, आकर्षक दिसावे, असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते, किंबहुना स्त्री जातीचा तो स्थायीभाव आहे. स्त्री, मग ती कोणीही असो, गरीब-श्रीमंत शिकलेली-न शिकलेली, कोणत्याही वयाची असो, कोणत्याही जाती-धर्माची असो, आपल्या देशातील असो वा परदेशातील, आपण चांगले दिसावे, आपली फिगर मेंटेन्ड् असावी असे तिला नक्की वाटते.

बर्‍याच स्त्रियांना असे फक्त वाटतच असते. आकर्षक दिसण्यासाठी काही विशेष परिश्रम घ्यावे लागतात, हे फार कमी स्त्रियांना कळते. बर्‍याच स्त्रियांना कळते, पण वळत नाही. न वळण्यामागची कारणे अनेक आहेत. फक्त सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठीच नव्हे, तर आपले जीवन शक्यतो निरोगी राहावे, लहान-सहान शारीरिक दुखण्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी घरकामाशिवाय दररोज आणि जन्मभर 20 ते 30 मिनिटे वेगळा असा शारीरिक व्यायाम करणे गरजेचे आहे. हे आधी मनाला पटले पाहिजे. बर्‍याच स्त्री-रुग्णांशी बोलताना असे लक्षात येते की, व्यायामाचे महत्त्व त्यांना सांगितले की पटते. आपणही आता उद्यापासून व्यायाम सुरूच करायचा, असा निश्चय त्यांच्या चेहर्‍यावर दिसतो. त्यातल्या काही स्त्रिया व्यायाम सुरूदेखील करतात; पण त्यांची खरी अडचण म्हणजे. चार दिवस करून सोडून देतात. त्यात सातत्य राहत नाही. जिथे सातत्य नाही तिथे अपेक्षित फळ नाही. जिथे अपेक्षित फळ नाही तिथे वैफल्य, निराशा, सोबत कंटाळा तर असतोच. याचे पर्यवसान महत्त्व पटूनदेखील व्यायाम प्रत्यक्ष कृतीत न उतरवण्यात होतो. असे होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे दृढ निश्चियाचा अभाव.

- Advertisement -

मान-पाठ दुखणे, कंबर दुखणे, अधूनमधून गुडघे-टाचा दुखणे, ओटीपोट जड वाटणे; बायकांच्या अशा अनेक तक्रारी घराघरातून सदैव चालू असतात. कधी त्या डॉक्टरांपर्यंत येतात, तर कधी येत नाहीत. नवरा सोशिक असेल तर डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी तो कंटाळा करत नाही. डॉक्टर गोळ्या लिहून देतात. एक्स-रे काढतात. गोळ्या तरी किती खाव्यात आणि औषधावर पैसे तरी किती खर्च करावेत. ही भावना पुन:पुन्हा त्रास देत असते. एवढे करून त्रास तर काही कमी होत नाही. अशी विचित्र अवस्था होऊन बसते.

नवरा जर समजुतदारपणा न दाखवणार्‍यांपैकी असेल तर तुझे हे नेहमीचेच झाले, म्हणून तो झिडकारतो.
या सर्व गोष्टींवर बिनपैशाचा जालीम उपाय म्हणजे, आपण उठतो त्या वेळेपेक्षा 20 ते 30 मिनिटे आधी उठण्याचा पराक्रम (!) करावा. पराक्रम यासाठी, की स्वत:च्या अंगावरचे पांघरूण काढून ठरलेल्या वेळेस उठणे म्हणजे दिवसाच्या सुरुवातीलाच स्वत:च्या मनावर मिळवलेला विजय होय. व्यायामाचा प्रकार स्वत:च निवडावा. आपल्याला कोणत्या प्रकारचा व्यायाम ‘सूट’ होतो, जो आपण येणारी अनेक वर्षे आवडीने आणि सातत्याने करू शकतो. तोच निवडावा.

प्रत्येकाला मॉर्निंग वॉकला जाण जमेलच असे नाही. ठीक आहे, घरी सूर्यनमस्कार घाला. अगदी रोज दोन सूर्यनमस्कारापासून सुरुवात केली तरी चालेल. पाठदुखी, कंबरदुखी, ओटीपोटवरचा सैलपणा कमी करण्यासाठी, काही ठराविक पद्धतीचे व्यायाम असतात. उदाहरणार्थ, बँक एक्स्टेंशन एक्सरसाईजेस, अ‍ॅबडॉमीनल मसल स्ट्रेंदनिंग एक्सरसाईज अर्थात पाठीच्या-मानेच्या स्नायूस बळकटी आणण्यासाठी किंवा पोटावरील चरबीचे प्रमाण कमी करून, तेथील स्नायू मजबूत करण्याचे व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्याने करता येतील. जरा मनावर घेऊन आपल्या स्वत:साठी थोडा वेळ काढला तर मान-पाठ दुखण्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची वेळच येणार नाही. आपल्याकडील स्त्रियांना घरी करावी लागणारी कामे- उदाहरणार्थ, झाडलोट करणे, भांडी घासणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे, वाकून जेवायला वाढणे, घरातील सामानाची आवरासावर करणे, ही कामे रोज करून करून मान, पाठ, कंबर दुखण्याचे प्रकार वाढत्या वयोमानाप्रमाणे जास्त होतात. ती कामे स्त्रियांना करण्याशिवाय गत्यंतरच नसते. अशा परिस्थितीत मानेला, पाठीला, कंबरेला व्यायामाने बळकटी आणणे हेच इष्ट, जेणेकरून कामाचा ताण सहन करण्याची शक्ती मिळू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या