Thursday, May 9, 2024
HomeUncategorizedआरोग्यदूत : नेल पॉलिश

आरोग्यदूत : नेल पॉलिश

चेहरा, हात, पाय, केस हे सगळे स्वच्छ आणि सुंदर ठेवणे जेवढे आवश्यक आहे, त्याहीपेक्षा नखे स्वच्छ ठेवणे हे जास्त आवश्यक आहे. कारण त्यांचा संबंध हा आरोग्याशी येतो. बहुतेक स्त्रिया घरात स्वयंपाक करतात. नखांमध्ये घाण असेल तर, असंख्य सूक्ष्मजीव स्वयंपाक करीत असताना अन्नात जातात. त्यामुळे नखे व्यवस्थित कापलेली असणे आणि त्यामध्ये घाण नसणे हे जरूरीचे असते. हाताच्या सौंदर्याच्या दृष्टीनेही नखे छान आकाराची आणि सुंदर दिसणे महत्त्वाचे असते. विविध रंगछटांचे नेलपॉलिश वापरून आपण नखे सुंदर बनवू शकतो. आजकाल सौंदर्य प्रसाधनाचा तो एक आवश्यक भाग झाला आहे.

हात आणि पाय या दोन्हींची नखे ही केरॅटिन या प्रथिनांची बनलेली असतात. प्रत्येक नख हे त्वचा आणि नख याखालील मूळ म्हणजे मॅट्रिक्समधून पुढे वाढत जाते. मॅट्रिक्सचा छोटा अर्ध चंद्राकृती भाग आपण नखाच्या मुळाशी पाहू शकतो. या भागाला ‘लुनुला’ असे म्हणतात. नखाच्या मुळाकचा भाग मृत पेशींनी आच्छादित असतो. याला क्युटिकल असे म्हणतात. याखाली नखे तयार करणार्‍या पेशी, मज्जातंतू व रक्तवाहिन्या यांची टोके असतात. यामुळे क्युटिकलच्या भागाला इजा झाली की, खूप दुखते.

- Advertisement -

क्युटिकलला वरचेवर इजा होत राहिल्यास संपूर्ण नखाला धोका संभवतो. नखाच्या मॅट्रिक्सखाली असलेल्या पेशी हळूहळू त्वचेच्या पृष्ठभागावर येतात. त्यामुळे मॅट्रिक्सच्या जवळच्या पेशी सपाट होतात आणि एकमेकीला घट्ट बांधून ठेवतात. या पेशींचे थरावर थर जमू लागले की, ते नखाला पुढे ढकलीत राहतात. त्यामुळेच नखाची वाढ सतत होत राहते. नखाच्या मोठ्या गुलाबी भागाला ‘नेल प्लेट’ असे म्हणतात. महिन्याला 2 ते 3 मिलिमीटर एवढी नखाची वाढ असते. पायांची नखे यापेक्षा हळूहळू वाढतात. उन्हाळ्यात नखांची वाढ हिवाळ्यापेक्षा जास्त असते.केरॅटिन हे प्रथिन खूप पाणी शोषून घेते म्हणूनच नखे पाण्यात बुडवली असता मऊ होतात आणि सहज कापली जातात. आपल्या बोटांची टोके अतिशय संवेदनशील असतात. त्यांचे संरक्षण करण्याचे काम नखे करतात. नखांचा रंग आणि अवस्था यावरून काही रोगांचे निदान लवकर करता येते. नखांच्या रचनेत हवेचा बुडबुडा आल्यास नखावर छोटा पांढरा डाग दिसू लागतो.

नखांना सुंदर बनवण्यासाठी नेलपॉलिशचा वापर केला जातो. यामध्ये साधारणपणे नायट्रासेल्युलोज नखाच्या संरक्षणासाठी, डायब्युटील थॅलेट नखांना चकचकीतपणा येण्यासाठी, ब्युटील आणि एथिल अ‍ॅसिटेट तसेच टोल्युइ रासायनिक घटक विरघळण्यासाठी, अल्किल इस्टर सुगंधी द्राव म्हणून, रंग स्निग्धतेसाठी ग्लॉयकॉलपासून बनवलेले घटक, चिकटण्यासाठी गम, नखाची हानी होऊ न देण्यासाठी अ‍ॅन्टिऑक्सिडन्ट म्हणून ‘फॉस्फरिक अ‍ॅसिड’ तसेच ‘अ‍ॅसिटोन’ अशा बर्‍याच घटकांचा समावेश असतो. नेलपॉलिशमधील रसायनांमुळे अ‍ॅलर्जी येऊ शकते. तशी आल्यास नेलपॉलिश लावल्यावर किती दिवस टिकून राहील हे त्याच्या किमतीवर किंवा घटकांवर अवलंबून नसते.

सगळ्या नेलपॉलिशमध्ये साधारणपणे सारखेच घटक असतात. साधारणपणे लावल्यापासून तिसर्‍या ते चौथ्या दिवशी नेलपॉलिशचे तुकडे पडू लागतात. हे होऊ नये म्हणून रोज त्यावर एक पातळ टॉपकोट लावणे जरूरीचे असते. काही नेलपॉलिशची जाहिरात खूप लवकर वाळणारी म्हणून केली जाते. पण खूप वेळा अशांचे तुकडे लवकर पडतात म्हणून शक्यतो अशी नेलपॉलिश वापरू नये. स्वच्छता करताना पाण्यात हात घालताना हातमोजे वापरल्यास नेलपॉलिश जास्त दिवस टिकते. तसेच नेलपॉलिश लावण्यापूर्वी नखांवर तेल किंवा क्रीम असता कामा नये. पत्रे फाडणे, डब्यांची झाकणे उघडण्यासाठी नखे वापरणे अशा गोष्टी करू नयेत. म्हणजे नेलपॉलिश जास्त दिवस टिकेल.

आपल्या नखांचा आकार, काही प्रमाणात रंग, लांबी, ठिसूळ किंवा कडकपणा हे बहुतांशी आनुवंशिक असते. तरीही नखे लवकर तुटू नयेत म्हणून ‘नेल हार्डनर्स’ किंवा ‘नेल स्ट्रेंदनर्स’ बाजारात मिळतात. पूर्वी यामध्ये फॉर्मल्डिहाईड असायचे ज्यामुळे नखांना कोरडेपणा येतो, पण आता त्यात अक्रेलिक, पॉलिस्टर्स आणि पॉलिएमाईड्स घालतात. त्यामुळे नखांना कडकपणा येऊन ती लवकर तुटत नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या