आरोग्यदूत : काळजी नखांची

आरोग्यदूत : काळजी नखांची

नेलपॉलिश लावण्यापूर्वी आधी जर नखांवर पूर्वीचे नेलपॉलिश असेल तर, ते काढून टाकण्यासाठी नेलपॉलिश रीमूव्हरचा उपयोग करावा लागतो. हा एक रंगहीन द्राव असतो. यामध्ये साधारणपणे अ‍ॅसिटोन, टॉल्यूइन, अल्कोहोल, अ‍ॅसिटेट्स व बेंझीन यासारखी रसायने नेलपॉलिश विरघळून निघून जाण्यासाठी घातलेली असतात. पण या रसायनांमुळे नखे कोरडी पडू शकतात. ते न होण्यासाठी, स्निग्धता राहण्यासाठी त्यामध्ये एरंड किंवा ऑलिव्ह यांचे तेल, लॅनोलिन यांचा समावेश असतो. सुगंध व इतर रसायनेही असतात. कापसाच्या बोळ्यावर नेलपॉलिश रीमूव्हर घेऊन नखांवरील नेलपॉलिश काढावे लागते. नेलपॉलिश रिमूव्हर वरचेवर वापरणे चांगले नसते. कारण त्यामुळे नखे कोरडी पडण्याचा संभव असतो. नेलपॉलिश लावतांना बाटलीतील ब्रशने पातळ थर लावायचा असतो. पहिला थर वाळला की, दुसरा लावायचा असतो व तो वाळला की, त्यावरून टॉपकोट लावायचा असतो. टॉपकोट म्हणजे रंगहीन नेलपॉलिश असते किंवा गुलाबी रंगाची अतिशय फिकी छटा त्यामध्ये असते. यामध्ये सर्वसाधारणपणे सेल्युलॉईड, असिटोन, अमाईल अ‍ॅसिटेट यासारकी रसायने असतात. टॉपकोटमुळे नखांना बळकटी येते. नेलपॉलिशचे तुकडे पडत नाहीत आणि नखांना चकाकी येते.

काही वेळा अपघाताने नख तुटते. अशावेळी नखांसाठी असलेला स्पेशल चिकट पदार्थ (ग्लू) वापरून नख दुरुस्त करता येते. या चिकट पदार्थात सायनोअ‍ॅक्रिलेट असते. हा पदार्थ, एनॅमल आणि रेशमाचे किंवा कागदाचे तुकडे यांच्या सहाय्याने नखांची दुरुस्ती करता येते. पण दुरुस्ती नीट झाली नाही आणि मध्ये फट राहिली तर त्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकते. शिवाय दुरुस्तीसाठी वापरलेल्या ‘नेल ग्लू’मुळे अ‍ॅलर्जी येऊ शकते आणि संपूर्ण नख अलग होऊ शकते. नखांइतकीच काळजी क्युटिकलची घ्यावी लागते. क्युटिकलला कमीत कमी धक्का लावणे आणि ते कमीत कमी मागे सारणे महत्त्वाचे असते. क्युटिकल कधीही कापू नये, त्यामुळे नखाची हानी होऊ शकते. नखामधल्या मृतपेशी आणि त्याखालचे नखाचे मूळ म्हणजे मॅट्रिक्स यामधल्या भागाचे संरक्षण करण्यासाठी क्युटिकलची योजना असते आणि म्हणून नखांइतकेच तेही महत्त्वाचे असते. खूप क्युटिकल काढले तर नखे ठिसूळ, वाकडी-तिकडी, नीट न वाढणारी, सालं जाणारी, कंगोरे असलेली अशी होऊ शकतात. क्युटिकलची काळजी घेण्यासाठी दिवसातून दोनदा तरी त्याला मॉइश्चरायझर लावावे. उन्हात जाणे जास्त असेल तर, सनस्क्रिन असलेले मॉइश्चरायझर वापरावे. क्युटिकल काढण्यासाठी क्युटिकल रीमूव्हर मिळते. यात सर्वसाधारणपणे खोबरेल तेल, पोटॅशियम फॉस्फेट, पोटॅशियम हायड्रॉक्साइड आणि पाणी तसेच ट्रायइथॅनोलॅमाईन यांचा समावेश असतो. या रसायनांची अ‍ॅलर्जी येऊ शकते.

ज्यांच्या नखांना अगदीच आकार नाही अशांना कृत्रिम नखे वापरता येतात. ही नखे ‘रेझीन’ व ‘अ‍ॅक्रेलिक ग्लू’ वापरून बनवलेली असतात. ती आपल्या नखावर ग्लूने चिकटवून, दाबून बसवता येतात. ती काढण्यासाठीही रीमूव्हर मिळतो. पण तो वापरणे धोक्याचे असते. ग्लू इतका पक्का असतो की, कृत्रिम नखे काढताना खरे नखच बाहेर सुटून येण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो कृत्रिम नखे वापरू नयेत.
काही विशेष लक्षात घेण्याजोगे कित्येक वेळा नखांवर शाई, तंबाखू, भाज्या यांचे डाग पडतात. ते घालवण्यासाठी ‘नेल ब्लीच’ मिळते. यामध्ये सर्वसाधारणपणे टिटॅनियम डायऑक्साईड, झिंक पेरॉक्साईड, पेट्रोलॅटम, मिनरल ऑईल. सुगंध अशा प्रकारची रसायने असतात. नखांना पांढरा रंग येण्यासाठी ‘नेल व्हाईटनर’ लावतात. हा क्रीम तसेच द्रव स्वरुपात मिळतो. पायाची नखे फार खोलवर कापू नयेत. नखांची वाढ बाजूच्या त्वचेमध्ये होऊ लागते जल ‘इनग्रोन नेल्स’ असे म्हणतात. नखांचा आकार न बदलणे आणि पायाच्या अंगठ्या भरपूर जागा असेल अशी चप्पल किंवा बूट वापरणे ही समस्या टाळण्यासाठी जरूरीचे असते. नियमितपणे पोहायला जाणार्‍यांनी पायांच्या नखांची काळजी जास्त घ्यायला हवी. ‘अ’ जीवनसत्व व कॅल्शियम यांच्या अभावाने नखे ठिसूळ व कोरडी पडतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com