Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे खा. गोडसेंच्या प्रयत्नांना यश; नाशिक-पुणे रेल्वे लाईन प्रस्तावास मान्यता

Share

देवळाली कॅम्प । वार्ताहर

नाशिक, पुणे या शहरांना जोडणार्‍या नाशिक-पुणे रेल्वे महामार्गाचा प्रस्तावाला यश आले असून मध्य रेल्वे प्रशासन बोर्डाने अटी-शर्तीवर तत्वत: मान्यता दिली. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे खा.हेमंत गोडसे यांनी सांगितले.

नाशिक, पुणे व मुंबई हा राज्यातील विकासाचा सुवर्ण त्रिकोण असल्याने नाशिक व पुणे हे शहरे रेल्वे मार्गाने एकमेकांना जोडले जावे, यासाठी खा. गोडसे पाठपुरावा करत होते. दोन वर्षापुर्वी संसदेत याबाबत आवाज उठविला तेव्हा या कामाच्या सर्व्हेक्षणासाठी अर्थसंकल्पात दोनशे कोटी रुपये मंजूर केले होते. यातून रेल्वे मार्गाच्या कामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

या मार्गाच्या प्रस्तावास अंतिम मंजूरी देऊन निधी उपलब्ध व्हावा म्हणून मागील आठवड्यात खा.गोडसे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. याबाबत मुंबईत झालेल्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन सदरची मागणी न्यायिक तसेच विकासासाठी योग्य असल्याने या प्रस्तावाला अटी-शर्तीवर तत्वत: मान्यता देण्यात आली.

यावेळी प्रस्तावाच्या डीपीआरमध्ये राज्य शासनाचे असलेले केवळ 20 टक्के शेअर्स, मुद्रांक शुल्काची अपेक्षित शाश्वती, प्रोजेक्टच्या व्यवहार्यतेसाठी विविध तांत्रिक विभागाची आवश्यकता व निरिक्षणे, प्रस्तावित रेल्वे मार्ग मालगाडी वाहतूकीसाठी सक्षम करण्यासाठीच्या उपाययोजना, प्रकल्प यशस्वीतेसाठी जेव्ही मॉडेल आणि एमसीए विभागाकडून मान्यता आदी मुद्यांवर प्रशासनाकडून निरिक्षणे नोंदविण्यात आले. बोर्डाच्या सकारात्मक भूमिकेमुळे नाशिक-पुणे रेल्वे लाईनचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता खा.गोडसे यांनी व्यक्त केली.

मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्णत्रिकोणात नाशिकचे महत्व अनन्यसाधारण आहे. नाशिक व पुणे ही शहरे रेल्वे मार्गाने एकमेकांना जोडले गेल्यास नाशिकचा विकास झपाट्याने होण्यास मदत मिळेल. सततच्या पाठपुराव्यामुळे प्रस्तावास मान्यता मिळाल्याने सुवर्णत्रिकोणाचे अपेक्षित उद्दीष्ट दृष्टीक्षेपात आहे.

– खा. हेमंत गोडसे

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!