दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत 869 कामांना मंजुरी; 42 कोटी 55 लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार : मेंगाळ

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणार्‍या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 869 कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी 42 कोटी 55 लाख रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात 24 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, अशी माहिती समाजकल्याण सभापती सुशीला मेंगाळ यांनी दिली.

सभापती मेंगाळ यांनी समाजकल्याण विभागाची आढावा बैठक घेऊन निधी खर्चाचे नियोजन केले. समाजकल्याण विभागामार्फत 20 टक्के दिव्यांग निधी व 5 टक्के वृद्ध कलावंतांना मानधन, आंतरजातीय विवाह योजनांची माहिती घेतली. यात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबवण्यात येणार्‍या दलित वस्ती सुधार योजनेचा आढावा घेतला. आंतरजातीय विवाह योजनेचे एकूण 450 प्रस्ताव प्राप्त झाले असून 2018-2019 या वर्षात 50 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. 2019-2020 मध्ये 30 लाख असा एकूण 80 लाख रुपये निधी प्राप्त आहे. मात्र केंद्र शासनाचा निधी प्राप्त झालेला नसल्याने हा निधी अद्याप खर्च झालेला नाही. त्यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे अनुदानाची मागणी केली आहे.

20 टक्के जिल्हा परिषद सेसअंतर्गत चारचाकी वाहन पुरवण्याबाबत 112 लाभार्थ्याना 2 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मागासवर्गीय तसेच अस्वच्छ व्यवसायात काम करणार्‍या पालकांना शिष्यवृत्ती योजना, आठवी ते दहावीमध्ये शिकणार्‍या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी देणे इत्यादी योजनांसाठी 2019-2020 मध्ये एकूण 2 कोटी 34 लाख रुपये अनुदान प्राप्त झाले असल्याचेही त्यांंनी सांगितले.

प्रस्तांवाची अंतिम छाननी करण्यात येत असून महिनाअखेर विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती व परीक्षा फी, शिक्षण फी जमा करण्यात येणार आहे.

– सुशीला मेंगाळ, सभापती, समाजकल्याण जि. प.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *