Thursday, May 2, 2024
Homeनगरप्रशासकांच्या नियुक्तीने ग्रामपंचायत विकासाला खीळ

प्रशासकांच्या नियुक्तीने ग्रामपंचायत विकासाला खीळ

टिळकनगर |वार्ताहर|Tilknagar

जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

मात्र पदभार घेतल्यानंतर प्रशासकांनी ग्रामपंचायतीकडे पाठ फिरविली आहे. आधीच कामात व्यस्त असलेल्या प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरूवात केली नसून ग्रामपंचायतीच्या विकासाला खीळ बसत आहे.

जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने त्याठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकार्‍यांचीच नियुक्ती करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्पातील पर्यवेक्षिकांची नियुक्ती करण्यात आली.

यापैकी काही अधिकार्‍यांकडे एक तर काहींचीे दोन ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकार्‍यांनी गावात जाऊन पदभार स्वीकारला आहे. मात्र, त्यानंतर गावात प्रशासक फिरकलेच नसल्याच्या तक्रारी आता ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहेत.

प्रशासकपदी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्‍यांकडे आधीच अनेक कामे आहेत. त्यातच ते व्यस्त असतात. सोबतच त्यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण अधिकच वाढला आहे. सध्या करोनामुळेही अनेक कामे वाढली आहेत.

त्यामुळे अधिकारी ग्रामपंचायतीकडे जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यासह तालुक्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नाल्या तुंबल्या आहेत. मात्र नाले सफाई किंवा रस्त्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही.

त्यामुळे गावगाड्याचा कारभार सध्या प्रभावीत झाला आहे. ग्रामस्थांची अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली असल्याने निवडणूक लवकरात लवकर घ्यायला हवी, अशी मागणी अनेकांकडून आता होऊ लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या