मनपाची अतिक्रमण निर्मुलन मोहीम समाप्त; ११ दिवसांत १७४ ठिकाणी कारवाई

0
नाशिक | विश्वस्त, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांच्या विरोध असला तरी महापालिकेच्या माध्यमातून गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेली अनधिकृत धार्मिकस्थळ विरोधी मोहिमेची सांगता आज झाली.

मागील 11 दिवसांते महापालिका हद्दीच्या रस्त्यावरील तब्बल 174 धार्मिक स्थळे हटविण्यात आली आहेत. जुन्या नाशकातील नानावली भागातील दगडफेकीची घटना वगळता पोलिसांच्या सहकार्याने पालिकेची ही कारवाई निर्विघ्न पार पडली.

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 2009 पूर्वीची रस्त्यावरील 150 अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधातील कारवाई महापालिकेने सुरू गेल्या 8 नोव्हेंबरपासून सुरू केली होती. ज्या सर्वेक्षणाच्या आधारे ही कारवाई सुरू झाली ते सर्वेक्षणाच चुकीचे असल्याचा दावा करीत धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी धार्मिक स्थळांचे विश्वस्त व मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती.

महापौर व स्थानिक आमदारांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. परंतु न्यायालयाच्या अवमाननेचा मुद्दा उपस्थित करीत फेरसर्वेक्षणाची मागणी प्रशासनाने फेटाळत कारवाई सुरू केली.

जी धार्मिक स्थळे 1960 पूर्वीच असतील अशा धार्मिक स्थळांबाबत पुरावे सादर केल्यास कारवाई मागे घेण्यात येईल, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळे पुराव्यांअंती काही धार्मिक स्थळे कारवाईतून वगळण्यात आली. तर काही धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी महापालिकेच्या या कारवाईला जिल्हा न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली होती.

या याचिकांच्या अनुषंगाने काही धार्मिक स्थळांवरील कारवाईला न्यायालयाने स्थगितीही दिली होती. परंतु त्यानंतर झालेल्या सुनावणीत कायम स्वरूपी स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून अशा धार्मिक स्थळांविरोधात महापालिकेची कारवाई सुरू होती.

या कारवाईदरम्यान गुरूवारी रात्रीच्या सुमारास जुन्या नाशकातील नानावली भागात पोलिस व पालिकेच्या पथकावर दगडफेकीचा प्रकार घडला. मात्र विरोधानंतरही पोलिस बळाच्या आधारे पालिकेने कारवाई पुर्ण केली. कारवाईच्या शेवटच्या दिवशी आज पंचशीलनगर, मुंबई आग्रा महामार्गालगत वोक्हार्ट हॉस्पीटलजवळ, मुंबईनाका, सातपूर विभागातील पपया नर्सरी लगत तसेच पंचवटी विभागातील मखमलाबादरोड आणि नाशिक पश्चिम विभागातील विश्रामबाग व तिडके कॉलनीतील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली.

LEAVE A REPLY

*