गंगेवरील बुधवारचा बाजार उठवला; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची अतिक्रमण निर्मुलन मोहीम

गंगेवरील बुधवारचा बाजार उठवला; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची अतिक्रमण निर्मुलन मोहीम

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात महापालिकेच्यावतीने अतिक्रमण निर्मुलन कारवाई करण्यात आली. यावेळी अनेक वाहनधारक तसेच विक्रेत्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारत गर्दी न करण्याचे आवाहन केले.

चीन देशातील वूहान शहरातून जगाच्या कानाकोपऱ्यात फैलाव झालेल्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशासह महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये खबरदारी घेतली जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करून शाळा, महाविद्यालय, मॉल खाजगी क्लासेस हे 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  तसेच अनावश्यक गर्दी टाळावी, सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. गर्दी न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नुकतेच काढले.

आदेशाचे पालन करत ठिकठिकाणी अंमलबजावणी केल्याचे दिसून येते. मात्र, नाशिकच्या पंचक्रोशीतील काही शेतकरी आणि किरकोळ व्यावसायिकांनी आजच्या बुधवारच्या बाजारात शेतमाल विक्रीसाठी आणलेला होता. यामुळे गर्दीचा धोका लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून  बाजारासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मनपा आणि जिल्हा प्रशासनाने दुकाने न लावण्याची विनंती केली होती, तशा सूचना महापालिकेने लाऊडस्पीकर वरून विक्रेत्यांना दिल्या होत्या.

मात्र तरीही दुकानदारांनी याकडे लक्ष न दिल्याने महापालिकेला अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, धडक कारवाई केल्यानंतर दुकानदारांनी आपला माल आवरून घेत बाजारातून काढता पाय घेतल्याचे चित्र दिसून आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com