Type to search

फिचर्स संपादकीय

चिथावणीखोर भाषणे दीर्घकाळ नुकसानकारक

Share

चिथावणीखोर भाषणे आणि उत्तेजक वक्तव्ये करण्याची राजकारण्यांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली दिसते. अशा भडकाऊ भाषणांचा राजकारण करण्यासाठी, मते मिळवण्यासाठी मदत होत असेलही, पण त्यामुळे समाज विघटनाच्या उंबरठ्यावर उभा राहातो. माणसांची मने दुभंगतात. ती पुन्हा जोडणे सोपे नसते. ही दीर्घकाळ नुकसान करणारी बाब आहे. ही बाब लक्षात घ्यायला हवी.
सुरेखा टाकसाळ

‘शस्त्र, हत्यार हा शब्द जरी केवळ पाहिला किंवा ऐकला तरी त्याची धारच प्रथम दिसते-जाणवते. मनुष्याने स्वत:च्या उपयोगासाठी, स्वसंरक्षणासाठी प्रथम दगडापासून आणि काळाच्या ओघात धातूपासून हत्यारे तयार केली व ती वापरत आला. लढाया, साम्राज्य विस्तारासाठी स्फोटक शस्त्रांचीही त्यात भर पडली. विसाव्या शतकात दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेने जपानवर अणुबॉम्बचा वापर केला. हजारो माणसे मरण पावली. मोठा विध्वंस झाला. जग भयभीत झाले. परंतु तरीही आण्विक विध्वंसक शस्त्रास्त्रांची जीवघेणी स्पर्धा या जगात सुरूच झाली. ती आजही चालूच आहे.

परंतु आण्विक शक्ती ही दुधारी आहे. तिचा विध्वंसासाठी वापर अधिक धोकादायक आहे आणि दुसरा शांततेसाठी. म्हणजेच ऊर्जा निर्मिती, विज्ञान विकास आणि मानव जीवनाच्या कल्याणासाठी. जो आवश्यक आहे. आणखी एक दुधारी शस्त्र (किंवा शक्ती म्हणा) म्हणजे जिव्हा, म्हणजेच वाणी! तिचा वापर कसा करायचा कुठे करायचा, का करायचा, हे जो तो स्वत: ठरवतो. पण त्याचे बरे-वाईट परिणाम लोकांवर, समाजावर, देशावर खोलवर व दीर्घकाळ होतात. रसाळ मधुर वाणी आणि शब्द मनाला सुख आनंद देतात. समाधान देतात. व्यथा, चिंता, दु:खही विसरायला लावतात. अध्यात्मात डुंबायला, तल्लीन व्हायला शिकवतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम असो की संत कबीर, हे सारे जण अध्यात्माबरोबरच प्रापंचिक जीवनाचे तत्वज्ञान शिकवून जातात. जीवनाला वळण लावतात. संत जनाबाई, बहिणाबाईदेखील यातल्याच. सरळ सोप्या शब्दात सज्जनपणाबरोबरच ठोशास ठोसा देण्याचे तत्वज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले. खंबीरपणे वागायचे धैर्य आणि जीवनाला नम्रपणे सामोरे जाण्यासही शिकवते. या थोर संत महात्म्यांनी समाज शिक्षण केले. त्यांच्या शब्दांनी पिढ्यान्पिढ्यांचे जीवन सावरले आहे. सुधारले आहे. तर वीरसरवाणीने मरगळ विसरायला लावून अंगी शौर्याचा संचार निर्माण करवला आहे.परंतु जिव्हेच्या वाणीच्या शस्त्राची दुसरी धार मात्र दुखावणारी आहे. ती मन घायाळ करते. तसेच माणसामाणसात, समाजात तेढ निर्माण करते. चिथावणी देते, द्वेष निर्माण करते. हिंसाचार, विध्वंसालाही आमंत्रण देते. इतिहासातील याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिटलर व त्याची गाजलेली भाषणे! त्या आगीत चार कोटींपेक्षा अधिक प्राणांची आहुती दिली गेली.

गेल्या काही वर्षांपासून वाणीची ही दुसरी धार वारंवार ‘तेज’ होत असण्याचा अनुभव आपल्याला येतो आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा समतामूलक, सर्वसमावेशक जातीरहीत समाजाचा आदर्श घटनाकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवला होता. देशाला नेतृत्व देणार्‍या नेत्यांचीही ती अपेक्षा होती. परंतु बदलत्या काळात राजकारणाच्या आणि त्यापुढेही जाऊन सत्तेच्या हव्यासापायी, निवडणुकीच्या राजकारणात जाती व धर्म, राजकारण्यांना सोयीस्कर वाटू लागले. त्यांच्या आधारावर मते मिळवण्यासाठी व मतांच्या धु्रवीकरणासाठी काही नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या जिव्हा, वाणी विषारी व्हायला वेळ लागत नाही, असेच दिसते आहे.

कडवट, निंदनीय, घृणास्पद शब्द किंवा एखादे प्रक्षोभक वाक्य देखील लोकांना चिथावण्यासाठी भडकावण्यासाठी किंवा संतापाची लाट निर्माण करण्यास पुरेसे असते. याचा अनुभव गेल्या काही दिवसांपासून वारंवार येतो आहे. काही युवकांप्रमाणेच आमदार, खासदार व मंत्री देखील यात मागे नाहीत ही खेदाची बाब आहे.चालू वर्षात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती देशात सर्वत्र साजरी होत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. ‘गांधीजी आमचे जीवन आहे’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. दोनच दिवसांपूर्वी, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला धन्यवाद देणार्‍या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान उभे राहताच, ‘महात्मा गांधी की जय’च्या घोषणा झाल्या. तेव्हा ‘हे ट्रेलर आहे’, असा उपरोधिक शेरा विरोधी पक्ष सदस्याने मारला. त्यावर ‘तुमच्यासाठी म. गांधी ट्रेलर असतील. आमच्यासाठी ते जीवन आहेत.’ असे पंतप्रधान म्हणाले.

हे एक प्रकारे खरेच आहे. कारण एकेकाळी महात्मा गांधींबद्दल जहाल मते असणार्‍या संघटनांनी आज त्याच राष्ट्रपित्यास ‘आमचे गांधी’ म्हणावे हा एका दृष्टीने गांधी तत्वाचा विजयच आहे. मानवतावादाचा वारसा असे गांधींना म्हटले जाते. हातात एकही शस्त्र न घेता अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध ज्यांनी लढा दिला. त्या लढ्याची भाजपच्याच एका नेत्याने ‘ड्रामा’ म्हणून संभावना करावी, याला काय म्हणावे? पक्षाने या खासदार नेत्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली की नाही, माहीत नाही. पण कान उघडणी तर निश्चितच झाली असणार.

मालेगाव स्फोट प्रकरणी चर्चित व भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची नथुराम गोडसेला हिरो व महात्मा गांधी यांना झिरो संबोधणारी निंदाजनक टिप्पणी कोण विसरेल? प्रसिद्धीच्या झोतात व वादग्रस्त राहण्याचीही काहींना हौस असते हे समजू शकते. परंतु आपल्या एका वाक्यामुळे आपण आपल्या पक्षाचे व समाजाचे नुकसान करत आहोत, याचेही भान लोकप्रतिनिधींना राहू नये?
नागरिकता दुरुस्ती कायदा (सीएए) संसदेत मंजूर झाल्यानंतर दिल्लीसहीत देशातील अनेक शहरात त्याच्या विरोधात व समर्थनाचे सूर उमटले. विरोधी सूर अधिक तीव्र होते. दिल्लीत तर आजही शाहीनबाग परिसरात तेथील लोक निदर्शने करीत आहेत. या निदर्शकांसमोर भाषण करताना, शारजील इमाम या सुविद्य तरुणाने ‘भौगोलिकदृष्ट्या आसामला भारतापासून तोडणे अवघड नाही,’ असे विघटनवादी विचार मांडले. शारजील हा आयआयटी पदवीधर तरुण जवाहरलाल नेहरु विद्यापिठात सध्या पीएच.डी. करत आहे. त्याची ही भाषा तो खचितच भारतविरोधी शक्तीच्या प्रभावाखाली असल्याचे निदर्शक आहे.अशी भडकाऊ, उत्तेजित वक्तव्य करणारी मंडळी अनेक पक्षांमध्ये, संघटनांमध्ये असतात. निवडणुका जवळ आल्या की, त्यांच्या जिभेला धार चढते. दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. परंतु तेथे निवडणुका जाहीर झाल्या दिवसापासून ते निवडणूक प्रचार संपेपर्यंत अशी उत्तेजक वक्तव्ये ऐकायला मिळाली. भाजपच्या प्रचार सभेत बोलताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘देश के गद्दारोंको… म्हणत श्रोत्यांना उचकावताच, श्रोत्यांनी गोली मारो’ म्हणत उत्तेजित, चढ्या स्वरात प्रतिसाद दिला.

दिल्लीचे एक खासदार परवेश साहीबसिंग वर्मा यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचा ‘दहशतवादी’, ‘नक्षलवादी’ असा उल्लेख केला. निवडणूक आयोगाने या दोघा नेत्यांवर चिथावणीखोर, उत्तेजक विधाने केल्यावरून अनुक्रमे 72 व 96 तासांपर्यंत जाहीर सभा, प्रचारात भाग घेण्यास बंदी घातली होती. पण याच परवेश साहीबसिंग वर्मा यांची भाजपने राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला धन्यवाद देणार्‍या प्रस्तावावरील चर्चेला प्रारंभ करण्यासाठी निवड केली! विरोधी पक्षांनी त्याबद्दल आरडा ओरड करून आपला निषेध नोंदवला.

प्रक्षोभक भाषणे, चिथावणीखोर वक्तव्ये, मते मिळवण्यासाठी निवडणुका जिंकण्यासाठी मदत करत असतीलही कदाचित. परंतु त्यामुळे मोडणारी, दुभंगणारी मने व समाज पुन्हा जोडणे सोपे नाही. दीर्घकाळ नुकसान करणारी ही दुर्दैवी बाब आहे. म्हणूनच अशा जिभेला, वाणीला वेळीच लगाम घालणे गरजेचे आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!