कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकर्‍याची आत्महत्या

0
जामखेड (प्रतिनिधी) – एकीकडे कर्जमाफीने आनंदोत्सव साजरा होत असताना तालुक्यातील पिंपरखेड येथील दिगंबर एकनाथ कारंडे (वय 60) या शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना आज सोमवारी पहाटे (दि.12) शेजार्‍यांच्या निदर्शनास आली.
पिंपरखेड येथील कारंडेवस्ती वरील दिगांबर एकनाथ कारंडे यांनी राहत्या घरापासून बर्‍याच लांब अंतरावर असलेल्या स्वत: च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. याची माहीती शेजार्‍यांनी त्यांच्या कुटूंबियांना कळवली. या घटनेची माहिती पोलीस पाटील उमाजी सातपुते यांनी जामखेड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
कारंडे यांच्यावर सेवा संस्थेचे 80 हजार व पत्नीच्या नावावर 3160 रूपयांचे कर्ज होते. तसेच एका खाजगी बॅकेचेही एक लाखाचे कर्ज असल्याची माहिती मिळाली आहे. हे कर्ज कसे फेडायचे नातीचे लग्न कसे करायचे यांची चिंता त्यांना सतावत होती.तसेच मुख्यमंत्री यांनी फक्त अल्पभूधारक शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. कारंडे यांच्या नावावर पाच एकर 28 गुंठे जमीन आहे. त्यामुळे या कर्जमाफीचा लाभ होत नाही म्हणून जीवनयात्रा संपवली असल्याचा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याबाबत पिंपरखेडचे पोलीस पाटील उमाजी सातपुते यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलीस निरिक्षक दिपकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक डी. आर. चव्हाण,जी.बी.यादव यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहीती घेतली. या घटनेची माहीती समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. होती. दुपारी एक वाजता त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्येसंस्कार करण्यात आले.
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना निकषावर आधारित सरसकट कर्जमाफी देण्याची तत्वत: मान्य करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली असतानाच दुसर्‍याच दिवशी तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकर्‍यांने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

LEAVE A REPLY

*