अण्णांचे लोकपाल, शेतकर्‍यांसाठी आंदोलन : राळेगणसिद्धीमध्ये राष्ट्रीय शिबिर

0

पारनेर (प्रतिनिधी) – सत्ता परिवर्तन करून काही साध्य होणार नाही. जनआंदोलनातून व्यवस्था परिवर्तन करणे हे उद्दिष्ट आहे. सध्याच्या सरकारला सत्तेची घमेंड निर्माण झाली असून जनतेची फसवणूक केली असल्याचा घणाघात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजप सरकारविरोधात पुन्हा जनआंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.

लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी, शेतकर्‍यांना न्याय व निवडणूक सुधारणा या मुद्द्यांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी जन आंदोलन सुरू करण्याचा निर्णय राळेगणसिद्धी येथे शनिवार दि. 8 पासून सुरू असलेल्या दोन दिवसीय शिबिरात घेण्यात आला.

जन आंदोलनाच्या तयारीसाठी देशभरातील प्रमुख कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय शिबिर राळेगणसिद्धी येथे आयोजित करण्यात आले होते. यात दिल्ली, गुजरात, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, पंजाब, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांतील निवडक व निमंत्रित कार्यकर्ते उपस्थित होते.

अण्णा म्हणाले, ग्रामसभा ही विधानसभा व लोकसभेची जननी आहे. म्हणून ग्रामसभेला अधिकार मिळाले पाहिजेत. पीक विम्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांची लूट होते. बँक रेग्युलेशन कायद्याचे बँकांकडून पालन होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. सर्वोच्च न्यायालयाने यावर स्पष्ट निर्देश दिले आहेत.

तरीही शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. औद्योगिक क्षेत्राला सर्व सोयीसुविधा देण्यात येतात. मंत्रालयात बसून शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करणे हे अन्यायकारक आहे. यावर शेतकर्‍यांनीच आंदोलन उभारण्याची गरज असून आगामी काळात शेतकरी संसदेत पाठवावे लागतील. यासाठी शेतकरी जनजागृती करण्यात येणार असल्याचे अण्णा हजारे म्हणाले.

सरकारी सेवा केलेल्या कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतन दिले जाते. शेतकरी हा सुद्धा देशाचा सेवक आहे. त्याला वयाच्या 60 वर्षानंतर निवृत्तिवेतन मिळाले पाहिजे. संसदेत प्रलंबित असलेले शेतकरी पेन्शन विधेयक तात्काळ मंजूर करावे.
आगामी आंदोलन हे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या अधिपत्याखाली करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

न्यासाचे प्रा. बालाजी कोंपलवार, अशोक सब्बन, अल्लाउद्दीन शेख, श्याम असावा, अजित देशमुख आदींनी चर्चेत सहभाग घेतला. राळेगणसिद्धीच्या सरपंच सौ. रोहिणी गाजरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

*