रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा : अण्णा हजारे

0

राळगेणसिद्धी येथील आरोग्य शिबिर आयोजनासंदर्भात आढावा बैठक

पारनेर (प्रतिनिधी) – राज्य शासनाने राळेगणसिद्धी येथे ग्रामीण आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना आरोग्य सेवेतून हातभार देण्याचा शासनाचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. राळेगणसिद्धी येथे येत्या 19 नोव्हेंबर 2017 रोजी होणार्‍या ग्रामीण आरोग्य शिबिरामध्ये आंतराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर तपासणीसाठी येणार असल्याने गरजू रुग्णांना लाभ देण्यासाठी प्रत्येकाने सेवा समजून हे काम करणे आवश्यक आहे. सेवेतूनच खरा आनंद मिळतो. त्यामुळे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून प्रत्येकाने सहभाग नोंदवण्याचे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी केले.
पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रामीण आरोग्य शिबिराचे येत्या 19 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9 वाजता आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित आढावा बैठकीत अण्णा हजारे बोलत होते. यावेळी आरोग्यदूत रामेश्वर नाईक, सरपंच रोहिणीताई गाजरे, उपसरपंच लाभेश औटी, महाराष्ट्र होमिओपॅथिक कौंसिलचे अध्यक्ष डॉ. अजित फुंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक पांडुरंग बोरुटे, तहसीलदार भारती सागरे आदी उपस्थित होते.
यावेळी शिबिराच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. शिबिरासाठी मुंबई, पुणे, नाशिक येथील विख्यात डॉक्टरांमार्फत विनामूल्य रुग्ण तपासणी केली जाणार असून यावेळी नेत्ररोग, ह्रदयरोग, अस्थिरोग, बालरोग, मूत्ररोग, स्त्रीरोग, नाक, कान, घसा, श्वसन विकार, कर्करोग, मेंदू रोग, दंतरोग आदी आजारांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. यावेळी केंद्र सरकारचा संत ईश्वरदास सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल रामेश्वर नाईक यांचा अण्णांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून वैद्यकीय शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन तसेच राळेगणसिद्धी परिवार यांच्या समन्वयाने या आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात येत्या 13 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान आरोग्यपूर्व तपासणी सप्ताह घेण्यात येणार असून, गरजू व गरीब रुग्णांनी मोठ्या संख्येने आपली पूर्वतपासणी नजीकच्या आरोग्य केंद्रात विनामूल्य करून नोंदणी करून घ्यावी.
– रामेश्वर नाईक (आरोग्यदूत)

LEAVE A REPLY

*