Friday, April 26, 2024
Homeनगरमरेपर्यंत बळीराजासाठी लढणार

मरेपर्यंत बळीराजासाठी लढणार

पारनेर |प्रतिनिधी| Parner

देशाचा अन्नदाता म्हणून ओळखल्या जाणार्‍या शेतकरी राजावर अन्याय सुरू आहे. केंद्र सरकारच्या फसव्या लेखी आश्वासनांवर आता विश्वास नाही.

- Advertisement -

पंतप्रधान कार्यालयाकडून 29 मार्च 2018 रोजी रामलिला मैदान येथे सात दिवस उपोषण करून केंद्र सरकारने सातव्या दिवशी लेखी आश्वासन दिले होते. त्याचे अद्याप पालन झाले नाही. आश्वासनाचे पालन होत नसल्यामुळे दुर्दैवाने मला माझ्या शेतकरी राजासाठी परत 30 जानेवारीला उपोषणाला बसावे लागणार आहे. यात बळीराजासाठी मरेपर्यंत लढणार असल्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.

राळेगणसिद्धीत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय किसान परिषदेत अण्णा हजारे बोलत होते. स्वामीनाथन आयोगासह शेतकर्‍यांचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरले असून शेतकर्‍यांच्या हक्कासाठी 30 जानेवारीपासून हजारे यांनी राळेगणसिध्दीत उपोषण करण्याचा संकल्प केला आहे. यासह राज्यातील 26 कृषी संघटना 100 ठिकाणी अण्णांच्या या शेतकरी आंदोलनाचा पाठींबा देणार असून ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराजे पवार यांनी दिली.

देशभर सुरु असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनावर केंद्र सरकारचे लक्ष नाही. आंदोलनात 50 हुन अधिक शेतकरी कष्टकरी शहीद झाले तरीही केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांवर हजारे यांच्या नेतृत्वाखाली ‘करेंगे या मरेंगे’ हे आंदोलन देशभरात छेडणार असे प्रदेशाध्यक्ष पवार यांनी यावेळी जाहीर केले. शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय किसान संघटना, प्रहार किसान संघटनेची सयुक्त राष्ट्रीय किसान परिषद 2021 चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी न्या. जि. डी. इमानदार, माजी न्या. एल.एल. सावंत, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. महेंद्र काबरा, मध्यप्रदेश अध्यक्ष सफल चौधरी, बिहारचे अण्णू जाजू, राज्यस्यानचे सोहनलाल मिना, गुरातच्या मनिषा वाघ, दिल्लीचे जे. पी. चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. गजेंद्र पाटील, प्रदेश सचिव मालती पाटील, राष्ट्रीय सचीव यु. आ. सिद्दीकी, हिरामण बांदल, स्वातीताई कदम, दिपक फालके, दिपक मुंदडा, अमोल पिसाल, रविराणा पवार युवक विद्यार्थी आयटी कामगार आघाडी अध्यक्ष, नंदुभाऊ लोखंडे पाटील प्रदेशसंघटक, शामराव पवार प्रदेश कार्यकारणी सदस्य, जयश्री चव्हाण, मेजर सुभाष वालुंज, जिजाबापु गलांडे, योगीनी डुडूलकर यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. आभार जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद दिवटे यांनी मानले.

किती अभ्यास करणार?

अण्णा हजारे यांच्या पत्रांवर अभ्यास करून उत्तर द्यावे लागते, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगीतले होते. यावरून किती वर्षे अभ्यास करणार असा प्रश्न हजारे समर्थकांमधून उपस्थित झाला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अण्णांच्या पत्रांची दखल घेतली जात नसल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. स्वत: अण्णांनी याबाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली. तेव्हा केंद्र सरकार किती वर्षे या पत्रांना उत्तर देण्याबाबत अभ्यास करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या