सायकलवारीतून ‘अन्न पूर्णब्रम्ह’चा संदेश

0

‘आम्ही सर्व सायकलिस्ट सदस्य पंढरपूरवारी दरम्यान ईश्वराला साक्षी मानून प्रतिज्ञा करतो की, आजपासून आयुष्यभर आम्ही अन्नाच्या प्रत्येक कणाचा मान राखू, घरी अथवा दारी, दैनंदिन जीवनात तसेच समारंभातही ताटात अन्न उष्टे टाकून बळीराजाने गाळलेल्या घामाचा अपमान होऊ देणार नाही, देशसेवेच्या अंतस्थ हेतूने आणि अन्न सुरक्षेचा भाग म्हणून पेटवलेली ही प्रतिज्ञाज्योत आम्ही इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहू.’ अशी शपथ नाशिक-पंढरपूर दरम्यान निघालेल्या सायकलवारीत सहभागी सायकलपटूंनी घेतली. नुसती शपथ न घेता तिचे तंतोतंत पालन करतांना सर्व सायकलपटू दिसून आले.

वारकर्‍यांच्या पायी दिंडीप्रमाणे सायकलवरून पंढरपूरवारीचा अनोखा उपक्रम नाशिक सायकलिस्टतर्फे यंदा सहाव्या वर्षी यशस्वीरित्या राबवण्यात आला. त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथांचे दर्शन घेवून निघालेली सायकलवारीने 3 दिवसात नाशिक ते पंढरपूर अंतर पार केले. टाळमृदुगांच्या गजरात, भजन-किर्तनांचा आनंद लुटत, विठ्ठलाचे नामस्मरण करत वारकरी दिंडींत चालत असतात.

याचपर्श्वभूमिवर सायकलवारीतून सायकलपटूंनी ‘पर्यावरण संवर्धन’ व ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’चा संदेश देत सायकलवारी यशस्वीरित्या पूर्ण केली. आषाढी एकादशी निमित्त नाशिक सायलिस्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित नाशिक ते पंढरपूर सायकलवारीत यंदाही अबाल-वृद्धांनी उत्फूर्त सहभाग नोंदवला. पंढरपूरीच्या विठ्ठलांच्या दर्शनाबरोबरच, पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सायकल दिंडीत सहभागी लहान मुलांनी पायी जाणार्‍या वारकर्‍यांना स्वच्छता व पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती केली.

सायकलचा वापर अधिकाधिक वाढला तर शहरातील प्रदूषण कमी होवून पर्यावरण संवर्धनास हातभार लागेल. शहराच्या आरोग्याबरोबरच वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल. अशी उदिष्टे समोर ठेवून सुरू झालेल्या नाशिक सायकलिस्टने आता अन्न वाया न घालवण्याचा स्तूत्य उपक्रम होती घेतला आहे. या उपक्रमाविषयी जनजागृती झाल्यास लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांमध्ये अन्नाची होणारी नासाडी टाळता येणे शक्य होणार आहे.

रंगला सायकल रिंगण सोहळा : दिंडीत रिंगण सोहळ्याचे मोठे महत्व आहे. याच पार्श्वभूमिवर सायकलवारीदरम्यान खेडलेकर महाराज आश्रमाच्या पटांगणवर सायकल रिंगण आयोजित करण्यात आले होते. यावेळी भजने, फुगडीत सायकलपटू दंग झाले होते. यानंतर मुखदर्शन घेवून सायकलपटू वाहनाने परतीच्या मार्गाला लागले.

LEAVE A REPLY

*