Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नवोन्मेषाची अनुभूती देणारा ‘अंकुर गणेश’; डॉ. अमोल कुलकर्णी साकारताहेत पर्यावरणपूरक मूर्ती

Share

नाशिक | संजय लोळगे 

शहर विकासाचे वारे वाहत असताना पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याची चळवळ सध्या सर्वत्र जोर धरत आहे. त्यातूनच शाडू मातीच्या गणेशमूर्तींना मागणी वाढल्याचे दिसून येते. गणेशोत्सवाला इको फ्रेंडलीचे मिळालेले अधिष्ठान हे काळाची गरज अधोरेखित करणारे आहे. आता त्याच्याही पुढचा टप्पा गाठलाय तो जेलरोड येथील मानसविकासतज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी यांच्या ‘अंकुर गणेश’ने!

सृष्टीच्या नवोन्मेषाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची किमया ङ्गअंकुरफ या शब्दातून प्रकट होते. या उदात्त हेतूने अंकुर गणेशमूर्तीचा प्रसार करणारे डॉ. कुलकर्णी हे पर्यावरणविषयक जनजागृती करणारे वाहक आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तींचे पाण्यात लवकर विघटन होत नाही.

त्यामुळे विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी तलाव किंवा नदीकिनारी अनेक गणेशमूर्तींची विटंबना झालेली उघड्या डोळ्यांनी बघावे लागते. पीओपीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान तर होतेच परंतु अशा मूर्ती पाण्यात विघटित न झाल्याने जलप्रदूषण होऊन नदीतील जीवसृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. ही बाब डॉ. कुलकर्णी यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्यांनी याबाबत समाजमनात परिवर्तन घडवून आणण्याचे निश्चित केले. पीओपीपेक्षा शाडू मातीच्या मूर्तीचे महत्त्व व गरज पटवून देण्यासाठी त्यांनी शाळा, महाविद्यालये व ओळखीच्या लोकांना प्रबोधन केले. हळूहळू लोकांनाही ते पटतेय हे लक्षात आल्यावर त्यांनी हा विचार सर्वदूर देण्याचे निश्चित केले.

याबाबत माहिती देताना डॉ. कुलकर्णी सांगतात, मूर्ती बनवणे, नैसर्गिक रंग तयार करणे याचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण न घेता केवळ एकलव्याच्या ध्यासातून ही कला आत्मसात केली. सध्या बाजारात शाडू मातीची मूर्ती म्हणून जनतेची सर्रास फसवणूक केली जाते. अशा वेळी केवळ पर्यावरणपूरक मूर्तींचा प्रसार, प्रचार व प्रबोधन महत्त्वाचे नसून पर्याय उपलब्ध करून देणे ही नैतिक जबाबदारी आहे. आम्ही शाडू मातीसह नैसर्गिक रंगांचा वापर करतो.

माझ्यासह पत्नी वृषाली, प्रशांत बेलगावकर अशा तिघांनी सुरू केलेल्या चळवळीत पुढे अर्चना गुंजाळ, सुनीता जानोरकर, दीपक दिघे, गणेश डांगी यांच्यासह मुलगा श्लोक, मुली स्वरा व अनन्या यांचे योगदान लाभत आहे. लेह-लडाख येथील पर्यावरणतज्ञ सोनम वांगचूक यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी शाडू मातीला पर्यावरणपूरक म्हणावे का, असा प्रश्न उपस्थित केल्यावर अनेक उपप्रश्न निर्माण झाले. अधिक खोलात गेल्यानंतर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. मुळातच शाडू माती ही आपल्या प्रदेशातील माती नसून ती गुजरात, राजस्थानमधील आहे.

महाराष्ट्रातील मातीत तिचे मिश्रण होऊ शकत नाही. शिवाय शाडू मातीत अंकुरण क्षमता नसते. मग एखाद्या प्रदेशातील माती आपल्या सण-उत्सवांसाठी उत्खनन करून टना-टनाने अशा प्रदेशात आणणे, ज्या प्रदेशाच्या इको सिस्टीममध्ये त्या मातीला काहीही स्थान नाही त्या मातीचा उपयोगसुद्धा नाही.

अशा मातीचे पुढे करायचे काय? म्हणजे पुन्हा पर्यावरणाचा समतोल ढासळला जाण्याची शक्यता वाढते व आपण एका वेगळ्या प्रश्नाला जन्म देतोय का? ही बाब लक्षात आल्यानंतर सजग होऊन आपल्याच मातीतून गणपती बनवण्याचे ठरवले आणि त्यातूनच ङ्गअंकुर गणेशफ ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवली.

गेल्या पाच वर्षांपासून गंगापूर, कश्यपी धरणातून माती आणून त्यावर प्रक्रिया करून अंकुर गणेशमूर्ती तयार केल्या जातात. अंकुर गणेशाचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तींमध्ये झाडे व फळभाज्यांचे बीज टाकले असल्याने मूर्तीचे विसर्जन बादली अथवा पिंपात न करता घरातल्या कुंडीतच केले जाते. त्यामुळे गणपतीच्या मूर्तीतील बीज अंकुरते व झाडाच्या रूपात गणपती वर्षभर आपल्याच घरात वास्तव्य करतात. ही भावना भक्तांना निश्चितच परमानंद देणारी आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!