अंगणवाडी सेविकेचा मुलांसह संशयास्पद मृत्यू
Share

नातेवाईकांची खून केल्याची तक्रार
कर्जत (वार्ताहर)- कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी येथे काल दि.21 रोजी सकाळी 9 वाजता अंगणवाडी सेविका उज्ज्वला संदीप जाधव (वय 24 वर्षे), उत्कर्षा संदीप जाधव (वय 8 महीने), व राजवीर संदीप जाधव (वय 5 वर्षे) या तिघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरामध्ये आढळून आले.हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकार्यांनी तिन्ही मृतदेह हे पुणे येथे ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यासाठी नेण्याचे सांगितले आहे.
याबाबत पोलीस पाटील हनुमंत शिंदे यांनी कर्जत पोलीस स्टेशनला खबर दिली की, कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी येथे राहत असलेल्या उज्ज्वला संदीप जाधव हिने घराच्या पत्र्यास साडी बांधून गळफास घेतला असून तिची मुलगी उत्कर्षा संदीप जाधव, व राजवीर संदीप जाधव यांचे मृतदेह घरातील लोखंडी खाटेवर दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून साहयक पेालीस निरीक्षक इडेकर तपास करीत आहेत.
या प्रकरणी मयत उज्वलाचा भाऊ योगेश निकाळजे याने मात्र त्याची बहिण व दोन्ही भाचे याचा त्याचा मेव्हणा संदीप व सासू, सासरे यांनी खून केला असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यास गेलो असता त्यंानी प्रतिसाद दिला नाही हे सांगतानाच येथिल उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय आधिकारी बागर यांनी जाणीवपूर्वक मृतदेहाचे शवविच्छेदन येथे न करता पुणे येथे ससून रूग्णालयात नेण्यास सांगितले आहे. आमच्याकडे मृतदेह नेण्यास पैसे नाहीत मग मृतदेह कसे घेऊन जाणार? येथे रूग्णवाहिका डॉक्टर देत नाहीत अशी खंत व्यक्त केली. मयत उज्वला हिची आईने देखील मुलीचा व नातवांचा खून झाल्याचे रडत रडत सांगितले. यावेळी मुलीच्या मृत्यूमुळे त्यांना शोक अनावर झाला आहे. आठ महिन्यांच्या कोवळ्या उत्कर्षाच्या मानेवर नखांचे ठसे आणि ओरखडा आहे. आईची आत्महत्या असेल तर तिने आत्महत्या का केली, किंवा त्याचा खून झाला असले तर या मागे नेमके कारण काय आहे हे पोलीस तपासात शोधण्याची गरज आहे.
नवरा व सासू-सासरे ताब्यात
याप्रकरणी घटना समजताच पोलीसांनी मयत उज्वला हिचा नवरा संदीप जाधव व सासू सासरे यांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी शवविच्छेदन अहवाल आल्यावरच नेमके सत्य समोर येईल.