अंगणवाडीताईंच्या आंदोलनाने दणाणली जिल्हा परिषद

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत संपावरील शासकीय व प्रशासकीय दडपशाही त्वरित थांबवून त्यांच्या प्रश्‍नांची तात्काळ सोडवणूक करण्याच्या मागणीसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सुमारे दोन हजार अंगणवाडी सेविकांनी तीन तास धरणे आंदोलन केल्याने जिल्हा परिषदेचा परिसर दणानून निघाला.
धरणे आंदोलन चालू असतांना महिलांनी रहदारीसाठी रस्ता बंद केल्याने अनेकांची तारंबळ उडाली. तर पोलिसांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांना अटक करण्यास असमर्थता दर्शविली. आंदोलनात कॉ. राजेंद्र बावके, कॉ. बन्सी सातपुते, सुमन सप्रे, अ‍ॅड.सुधीर टोकेकर, मदिना शेख, स्मिता औटी, जीवन सुरुडे, अनिता पालवे, शरद संसारे, राजेश खरात, नंदा पाचपुते, मीरा दहातोंडे, मायाताई जाजू, जयश्री भोग, शोभा लांडगे, नयना चाबुकस्वार,
सुनीता वाणी, सविता ढवळे, इंदुबाई दुशिंग, आशा बुधवंत, शर्मिला रणवीर, अनिता वाकचौरे आदींसह मोठ्या संख्येने अन्य अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढ व आहार शुल्क वाढीसह विविध मागण्या सोडविण्यासाठी शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली दि.11 सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.
समितीने संप सुरु होण्याच्या दोन महिन्या अगोदर शासनाला संपाची नोटीस दिली होती. मात्र शासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने सदर संप पुकारण्यात आला आहे. हा संप बेकायदेशीर नसून, संपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जबाबदारी पूर्णत: सरकारची असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
शासनाने नुकतीच अंगणवाडी कर्मचार्‍यांना मानधनात दिलेली दरवाढ ही अत्यंत तंटपुजी असून, वेतनवाढ समितीने सादर केलेल्या कोणत्याही शिफारशीची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र शासनाने एकतर्फी मानधनात तटपुंजी वाढ जाहीर करुन, राज्यव्यापी संपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. हा शासनाचा प्रयत्न अंगणवाडी कर्मचार्‍यांनी हाणून पाडला असून, राज्यात व जिल्ह्यात संप जोरदारपणे चालू आहे.
शासनाने गठित केलेल्या वेतनवाढ समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी होत नाही. तो पर्यंन्त बेमुदत संप चालू राहणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. शासन व प्रशासनाच्या वतीने सदर संप दडपशाही व दबावाने मोडण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्ह्यातील सर्व तालुका प्रकल्प कार्यालयात अंगणवाडी कर्मचारी बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मानधना ऐवजी वेतनश्रेणी द्यावी. वेतनवाढ समितीच्या शिफारशीची तातडीने अंमलबजावणी करावी. अंगणवाडी कर्मचार्‍यांना दरमहा पेन्शन, उपदान, भविष्य निर्वाह निधी व इएसआयसी योजनांचा लाभ द्यावा. नागरी भागातील बालवाडी सेवा केलेल्या व सध्या अंगणवाडी केंद्रात नेमणुक झालेल्या सेविकांची बालवाडीची सेवा लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावी. प्राथमिक शाळेप्रमाणे अंगणवाडी केंद्रांना एक महिन्याची उन्हाळी सुट्टी देण्यात यावी.
मिनी अंगणवाडी सेविकांबरोबरच मदतनिसांचे पद निर्माण करावे व मिनी अंगणवाडीचे रुपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांना देण्यात आले.
आंदोलनकर्त्यां महिलांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे कराचे काय? खाली डेेकेवर पाय, पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी हाय हाय, हमारी युनियन हमारी ताकद, कोण म्हणतो देणार नाही…घेतल्या शिवाय राहणार नाही, मानधन नको वेतन द्या, वेतन आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, पंकजा मुंडे काय म्हणते…वेतन द्याचे नाय म्हणते, पिंजर्‍यायातील मैना काय म्हणते… वेतन द्याला नाय म्हणते आदी जोदार घोषणा दिल्या. हे घोषणा युध्द आलटून पालटून सुमारे तास सुरू होते.

 

LEAVE A REPLY

*