मासिक अहवालावर अंगणवाडी सेविका टाकणार बहिष्कार

0

वेतनवाढीचा निर्णय जाहीर होईपर्यंत

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मानधन वाढीसह इतर मागण्यांबाबत आझाद मैदानात 25 जुलै 2017 रोजी झालेल्या मोर्च्याच्या वेळी कर्मचार्‍यांच्या मानधनात भरघोस वाढ करून आठ दिवसांत बैठक घेऊन सदरचा प्रश्न मार्गी लावण्याचे समक्ष येऊन जाहीरपणे दिलेले आश्वासन न पाळल्याच्या निषेधार्थ मागणी पूर्ण होईपर्यंत कोणताही मासिक अहवाल न देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती कृती समितीचे कॉ. राजेंद्र बावके यांनी दिली आहे.

यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कॉ. राजेंद्र बावके यांनी सांगितले की, राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांना इतर राज्याप्रमाणे मानधनात वाढ करण्यात यावी या व इतर मागण्यासाठी मुबंई, नागपूरसह जिल्ह्यात विविध आंदोलने सातत्याने करण्यात आली. 25 जुलै 2017 रोजी मुबंई येथे पावसाळी अधिवेशनाचे औचित्य साधून राज्यभरातील हजारो अंगणवाडी कर्मचार्‍यांनी कृती समितीच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते.

दरम्यान या आंदोलनाला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी भेट देत मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेऊन आठ दिवसांत मानधनवाढ व इतर प्रश्न तत्काळ मार्गी लावणार व विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. या आश्वसनामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यामध्येे उत्साह संचारला होता. परंतु ना. पंकजा मुंडे यांनी दिलेल्या आश्वसनावर काहीच कार्यवाही होत नसल्याने ते आश्वासन फसवे निघाल्याने अंगणवाडी कर्मचार्‍यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान शासनाने सकारत्मक निर्णय घेतला नाही तर 11 सप्टेंबर 2017 पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनवाढी बाबत कृती समिती व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या समवेत चार बैठका झाल्या असून मानधनवाढी संदर्भात अहवाल ही सादर केलेला आहे. त्यावर ही अद्याप ठोस निर्णय झाला नाही.

शासनाच्या या धोरणामुळे नाइलाजास्तव अंगणवाडी कृती समितीला मासिक अहवाल बहिष्कार व संपाचे हत्यार उपसावे लागत असल्याचे कॉ. बावके यांनी सांगितले. तरी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी मासिक अहवाल बहिष्कार 100 टक्के यशस्वी करण्याचे आवाहन कॉ. राजेंद्र बावके, कॉ. बाळासाहेब सुरुडे, कॉ. मदिना शेख, कॉ. शरद संसारे, कॉ. जीवन सुरुडे यांनी केले आहे.

राज्यभरातील अंगणवाडी कर्मचार्‍यांचा अपेक्षाभंग झाल्याने जोपर्यंत मानधन वाढ जाहीर होत नाही तोपर्यत मासिक अहवाल न देण्याचा व कोणत्याही शासकीय बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय कृती समितीने घेतलेला आहे. शासनाने दिलेले आश्वासन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बहिष्कार सुरूच राहणार आहे.

LEAVE A REPLY

*