कवी अनंत फंदी व्याख्यानमाला : ज्ञानयुगात झेप घेण्यासाठी भारताला ज्ञानाधिष्ठीत समाजाची गरज

0

डॉ. विवेक सावंत

पुष्प-3

संगमनेर (प्रतिनिधी) – 21 व्या शतकात मुलभूत स्थित्यांतरं होत आहे. त्यामध्ये माहितीपेक्षा ज्ञानाला महत्व दिलं जावू लागलं आहे. तेव्हा ज्ञान युगात झेप घेण्यासाठी भारतात ज्ञानाधिष्ठीत समाज निर्माण होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. विवेक सावंत यांनी केले.

कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प ‘भारतीयांची ज्ञानयुगात झेप-संधी व आव्हाने’ या विषयावर गुंफतांना डॉ. सावंत बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे होत्या. व्यासपीठावर नारायण कलंत्री, अनिल राठी उपस्थित होते.

डॉ. विवेक सावंत म्हणाले, माहिती व तंत्रज्ञान युगात नवीन कल्पना, नवीन ज्ञान घेवून काम करावे लागणार आहे. माहिती प्रधान सभ्यतेने क्रांती केली. त्यामुळे माहिती प्रधान अवस्थेवर तुमचं जीवन अवलंबून राहायला लागलं आहे. माहितीच्या महत्वानंतर 21 व्या शतकात मुलभूत स्थित्यांतरात ज्ञानाला महत्व येवू लागलं आहे.

शेती, उद्योग, व्यवसाय ज्ञानाधिष्ठीत करावे लागेल. त्यामुळं सर्वसामान्य माणसाला ज्ञान प्रक्रियेत आणण्याची गरज आहे. नवीन ज्ञानाची निर्मिती होतांना जुन्या ज्ञानाची सांगड घालावी लागणार आहे. जाती, पाती, धर्म ही विषमता तोडून सर्वसामान्य समाज ज्ञानाधिष्ठीत करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करावे लागतील. तेव्हाच ज्ञान युगात भारत झेप घेवू शकेल. प्रत्येकाला ज्ञान घेता आलं पाहिजे आणि देताही आलं पाहिजे. जसं ऑक्सीजनसाठी पर्यावरण असतं तसं ज्ञानाचं पर्यावरण निर्माण आहे फक्त ते आत्मसात करावे लागणार आहे.

तंत्रज्ञानाचा वापर आता विविध क्षेत्रात होतांना दिसतो आहे. तसा तो शेती क्षेत्रातही दिसून येत आहे. परावलंबी शेतीकडून स्वावलंबी शेतीकडे आता वाटचाल सुरु आहे. भविष्यात शेतात अ‍ॅग्री रोबो दिसू लागले तर नवल वाटू नये, कारण आत्ताच जपानमध्ये रोबोंची संख्या वाढल्याने नव्या प्रश्‍नाची निर्मिती झाली आहे.

विविध तंत्रज्ञान निर्मिती होत असतांना ग्लोबल वार्मिंगचा धोका असतांना त्यावरही मात करण्यासाठी मानव जात तयार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करत मानवाने अनेक गोष्टी साध्य केल्या. याविषयी विविध दाखले श्रोत्यांपुढे मांडत डॉ. सावंत म्हणाले, सौजन्य शिकविणारा भारत देश आहे. त्यामुळं पृथ्वीचा तापही कमी करण्याचं धाडस भारत देश करु शकतो. सर्जनशिलता, नवनिर्मितीमुळे भारत भविष्यात ज्ञानयुगात झेप घेवू शकतो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
सूत्रसंचालन जसपाल डंग यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले. व्याख्यानमालेस मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

आजचे व्याख्यान –
मंदार भारदे – माझं आणि माझ्या बोक्याचं ब्लड प्रेशर

LEAVE A REPLY

*