एक लाखांत साकारता येणार भूकंपरोधक अलिशान घर

0
नाशिक | आता एक लाखांत बनवता येणार भूकंपरोधक अलिशान घर. या संकल्पनेतून अनेक बेघरांचे घरांचे स्वप्न साकार होणार आहे.  वीरमाता जिजाबाई इन्स्टिट्यूटच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक आणि मुंबई विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य डॉ. अभय बाम्बोले यांनी भूकंपरोधक आणि आरसीसी बांधकामाप्रमाणे मजबूत असणारी घरबांधणीची एक पद्धती विकसित केली आहे. या पद्धतीचे पेटंट अद्याप आलेले नाही. दिनांक २ जानेवारीला डॉ. अभय बाम्बोले भारतात परतणार आहेत. त्यानंतर ते या पद्धतीवर भाष्य करणार आहेत.

या घराबाबत सांगायचे झाले तर ३०० ते ४०० फुटांचे युनिट असेल. यात किचन, टॉयलेटचा समावेश असून स्वच्छ भारत मिशन अंतर्गतही घरे हा योग्य पर्याय असल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉ. बाम्बोले यांनी विकसित केलेल्या तंत्रामध्ये घराच्या उंबरठ्यावर उपलब्ध होतील अशा साहित्याचा उपयोग केला आहे. यात बांधकामाचा पाया भरणे, भिंती आणि स्लॅब तयार करण्यासाठी तारांचे जाळे, वाळलेला पेंढा-गवत आणि स्थानिक माती वापरण्यात येते.

भिंती आणि स्लॅबपॅनेल बनविण्याच्या प्रक्रियेत तारांचे जाळे हे माती व पेंढा-गवतयांच्या मिश्राणाने घट्ट केलेले असेल. नंतर या पॅनेलला नेहमीच्या वाळू-सिमेंटमिश्रणाचा लेप दिला जातो.

अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या भिंती आणि स्लॅब यांची आवश्यक ते वजन पेलण्याच्या क्षमतेची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विभागात भूकंप सिम्युलेशन यंत्राची (शेकटेबल) नुकतीच उभारणी केली आहे.

तब्बल ५० लाखांहून अधिक किंमत असलेली ही यंत्रणा महाविद्यालयाने जागतिक बँकेकडून मिळालेल्या निधीतून विकत घेतली आहे. या यंत्रणेद्वारे घरांच्या प्रतीकृतिची भूकंपरोधक क्षमतेची चाचणी केली जाणार असून तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे विकसित अशी घरे भूकंप प्रवण भागासाठी वरदान ठरणारी आहेत.

डॉ़. बाम्बोले सध्या अमेरिकेत आहेत. ते एका विद्यापीठात अध्यापनाचे काम करतात. या घरांची भूकंपप्रवणक्षमता वाढविण्यासाठी डॉ़. बाम्बोले सध्या संशोधन करत आहेत. ते म्हणतात, सर्वसामान्य नागरिक, स्वयंसेवी संस्था तथा सरकार, या तंत्रज्ञानाचा वापर करून घरबांधणीसाठी लागणारा खर्च खूपच कमी करू शकतात.

केंद्रसरकारच्या महत्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेसाठी त्यांनी विकसित केलेले हे तंत्रज्ञान खूपच उपयोगी ठरेल आणि देशात २०१९ पर्यंत ग्रामीण भागातील गरीबांसाठी १.३५ कोटी घरे उभारण्याचे शिवधनुष्य पेलण्यास समर्थ ठरेल असा विश्वास डॉ़. बाम्बोले यांनी व्यक्त केला आहे.

अशी आहेत वैशिष्ट्ये :

  • घरांचे आयुष्य ४० वर्षांपेक्षा अधिक असेल.
  • जलदबांधणी – एक घर १०दिवसांत बांधून पूर्ण होणार.
  • स्थानिक स्तरावर उपलब्ध़ साहित्याचा व संसाधनांचा जास्तीत जास्त वापर व त्यामुळे वाहतूक खर्चाचे प्रमाण नगण्य.
  • घरांची सौंदर्य पूर्ण रचना.
  • विटांच्या बांधकामाप्रमाणे जाडभिंती (६ ते ९ इंच) मजबूत आणि सुरक्षितता प्रदान करणाऱ्या भिंती.
  • कांक्रीट स्लैबच्या बांधकामाप्रमाणे जाड, मजबूत तसेच पाऊस व वादळवाऱ्यापासून सुरक्षितता प्रदान करणारे छप्पर.
  • सर्व प्रकारच्या हवामानात टिकाऊ व कमी देखभाल खर्च.
  • अर्धकुशल किंवा अकुशल बांधकाम कामगारांना या तंत्रज्ञानाचे कमीत कमी वेळेत प्रशिक्षण.

LEAVE A REPLY

*