Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

विद्यापीठाचे ‘कतार’ येथे शैक्षणिक उड्डाण; सप्टेंबरपासून पदवीचे अभ्यासक्रम

Share

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कतारमधील बहुचर्चित शैक्षणिक केंद्रात अध्यापन सुरू होण्याला गती मिळाली असून सप्टेंबरपासून तेथे शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी असे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमांना मिळणार्‍या प्रतिसादानुसार दुसर्‍या टप्प्यात अभ्यासक्रम सुरू केले जातील. त्यामुळे शैक्षणिक केंद्राच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परदेशवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. विद्यापीठाचे शैक्षणिक केंद्र दोहा (कतार) शहरात होणार असून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शैक्षणिक केंद्र उभारण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विद्यापीठाने कार्यवाही सुरू केली आहे. विद्यापीठाकडून कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

प्रत्येक अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 60 ठेवण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनांनुसार शैक्षणिक केंद्र निर्माण करण्यासोबतच ते यशस्वीपणे चालवण्याबाबत सविस्तर आराखडा तयार करण्यात येत आहे. आराखडा तयार झाल्यावर राज्य सरकारकडून आवश्यक त्या परवानगी घेण्यात येतील. विद्यापीठाला स्वायत्तता असल्याने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून आवश्यक परवानगी मिळण्यात अडचण निर्माण होणार नाही. कतारमधील शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून सुरू होते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासूनच अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने पूर्ण प्रयत्न सुरू आहेत.

शैक्षणिक केंद्र कतारमध्ये असले तरी त्यावर संपूर्ण नियंत्रण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे असणार आहे. प्राध्यापक निवडीपासून ते केंद्राचा कारभार सुरळीत करण्यामध्ये विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. केंद्रामधील आवश्यक पायाभूत सुविधादेखील विद्यापीठाच्या सूचनांप्रमाणे निर्माण करण्यात येतील. केंद्र उभारण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला कोणताही खर्च येणार नाही. संपूर्ण खर्च कतार सरकार आणि दोहामधील स्थानिक प्रशासकीय यंत्रणा करणार आहे. याउलट विद्यापीठालाच उत्पन्नातील काही टक्के वाटा मिळणार आहे.

कतारमध्ये शैक्षणिक केंद्र का?

कतारमध्ये आशिया खंडाच्या विविध देशांतील लोक नोकरी आणि व्यवसायानिमित्त राहतात. त्यांची लोकसंख्या जवळपास 10 लाख आहे. त्यात भारतीय सुमारे 7 लाख असून महाराष्ट्रातून आलेल्यांची संख्या अधिक आहे. मात्र तेथे आशिया खंडातील प्रमुख विद्यापीठ कार्यरत नाही. ही बाब पुढे आल्यानंतर कतार सरकारने शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अग्रेसर असणार्‍या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची निवड केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!