प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची 'ती' ऑफर का नाकारली? जाणून घ्या

Nilesh Jadhav

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) काँग्रेसमध्ये (Congress) सहभागी होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.

किशोर यांनी गेल्या आठवडय़ात सोनिया गांधी (Sonai Gandhi) यांची भेट घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासंदर्भात काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत प्रेझेंटेशनही दिले.

त्यामुळे ते काँग्रेसमध्ये कधी सहभागी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, स्वतः प्रशांत किशोर तसेच काँग्रेसकडूनही ते पक्षामध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशांत किशोर यांनी ट्वीट करून काँग्रेस प्रवेश न करण्याचे कारण स्पष्ट केले. काँग्रेसने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीचा सदस्य बनावे व निवडणुकांची जबाबदारी सांभाळावी असा प्रस्ताव दिला होता, पण तो नाकारला असल्याचे ट्वीट किशोर यांनी केले.

''मला नम्रपणे वाटते की, माझ्यापेक्षा काँग्रेस पक्षाला भक्कम नेतृत्वाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे. त्याद्वारे पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करता येईल,'' असे ट्वीट करून किशोर यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.

दरम्यान प्रशांत किशोर यांचं काँग्रेसमध्ये सहभागी न होण्याचं आणखी एक कारण त्यांची ipac ही संघटना असल्याचं बोललं जात आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये प्रशांत किशोर यांचे नेते आणि पक्षांशी चांगले संबंध आहेत, जिथे काँग्रेसची त्यांच्याशी थेट स्पर्धा आहे.