Nilesh Jadhav
लोकसभा सचिवलयाने राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. अखेर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
मात्र कोर्टाच्या निर्णयानंतर खासदारकी गमावणारे राहुल गांधी हे पहिले नेते नाही. या आधीही कोर्टाच्या निर्णयानंतर अनेक दिग्गज नेत्यांनीही आपली खासदारकी, आमदारकी गमवावी लागली आहे. जाणून घेऊयात कोण आहे ते दिग्गज नेते.
लालू प्रसाद यादव
शेकडो कोटी रुपयांच्या चारा घोटाळा केसमध्ये लालू प्रसाद यादव यांना सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांनी त्यांची लोकसभेची सदस्यता गमावली. ते बिहारच्या सारन मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते.
आझम खान
नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांचंदेखील नाव या यादीत आहे. गेल्या वर्षी ते हेट-स्पीच केसमध्ये दोषी असल्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. त्यानंतर त्यांची विधानसभेची सदस्यता रद्द करण्यात आली. तसेच त्यांना तुरुंगातही जावं लागलं. खान यांच्याविरोधात अनेक खटले होते. त्यावरदेखील या काळात सुनावणी झाली. यापैकी अनेक खटल्यांमध्ये खान यांना दोषी ठरवण्यात आलं.
मोहम्मद फैजल
यावर्षी १३ जानेवारी रोजी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांची सदस्यता रद्द करण्यात आली होती. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर एक खटला सुरू होता. या खटल्यात त्यांना केरळमधल्या एका सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. न्यायालयाच्या निर्णयानंतर दोन दिवसांनी लोकसभा सचिवालयाने त्यांना संसदेतून बाहेरचा रस्ता दाखवला. तशी अधिसूचना सचिवालयाने जारी केली होती. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी फैजल यांच्या मतदार संघात पोटनिवडणूक पार पडली.
विक्रम सैनी
मुजफ्परनगर दंगलीप्रकरणी भाजपाचे आमदार विक्रम सैनी दोषी आढळले होते. त्यामुळे त्यांना विधानसभेची सदस्यता गमवावी लागली. मुजफ्परनगर एमपी-एमएलए कोर्टाने २०१३ मधील मुजफ्परनगरमधील दंगलीतल्या त्यांच्या सैनी यांच्या भूमिकेमुळे त्यांना शिक्षा झाली होती. ते उत्तर प्रदेशमधल्या खटौली मतदार संघातून निवडून आले होते.