मराठमोळ्या अविनाश साबळेचा अमेरिकेत डंका; ३० वर्ष जुना 'तो' विक्रम मोडला

Nilesh Jadhav

महाराष्ट्राचा सुपुत्र आणि भारतीय लष्करात सेवा बजावत असलेल्या धावपटू अविनाश साबळे (Avinash Sable) यानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

अविनाश साबळेने ५ हजार मीटर शर्यतीत बहादूर प्रसादचा ३० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये अविनाशने १३:२५.६५ वेळ नोंदवत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.

अविनाश साबळेने या शर्यतीत १२ वे स्थान पटकावले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये १५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा नॉर्वेचा जेकब इंजेब्रिग्टसेन हा विजेता ठरला. त्याने १३:०२.०३ सेकंदात शर्यत पूर्ण केली.

बहादूर प्रसाद यांनी १९९२ मध्ये बर्मिंगहॅम येथे १३:२९.७० सेकंदांच्या वेळेसह राष्ट्रीय विक्रम केला, जो ३० वर्षे अबाधित राहिला.

अविनाश साबळे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा या गावचा रहिवासी आहे. अविनाश लिम्पिकसाठी तयारी करत आहे. त्याला राज्य सरकारने ऑलिंपिकच्या पूर्व तयारीसाठी ५० लाख रुपये दिले आहेत.

अविनाश साबळे गेल्या अनेक वर्षांपासून धावण्याच्या अडथळ्यांच्या शर्यतीचा सराव करत आहे. त्याने यापूर्वी देशातील नामांकित स्पर्धेत भाग घेऊन पदके जिंकलेली आहेत.