Nilesh Jadhav
तमिळनाडूमध्ये बुधवारी लष्काराचं एक हेलिकॉप्टर कोसळून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचं निधन झालं.
यामध्ये जनरल रावत त्यांच्या पत्नीसह १४ जण होते. हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे निधन झाले तर पत्नी मधुलिका आणि लष्करातील ११ अधिकारी आणि जवानांचाही मृत्यू झाला. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशातील सैन्याच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याच्या निधनानंतर आता चर्चा सुरु झाली आहे की, देशाचे पुढचे सीडीएस कोण? त्यासाठी आता लष्कर प्रमुख मनोज मुकूंद नरवणे (manoj naravane) आणि वायूदल प्रमुख व्ही.आर.चौधरी (v chaudhari) या दोन मराठमोळ्या अधिकाऱ्यांचे नाव समोर येत आहे.
सेवाज्येष्ठतेचा विचार करता जनरल एमएम नरवणे (Manoj Naravane) हे या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दिसत आहे. तिनही सेना प्रमुखांमधून सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तीची या पदासाठी निवड केली जाऊ शकते.
लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे आहेत. जर या दोघांमध्ये अनुभव आणि सेवाज्येष्ठतेचा विचार केला तर, एमएम नरवणे हेच या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दिसत आहे.
नरवणे हे ६० वर्षांचे आहेत. जनरल बिपिन रावत यांच्यानंतर त्यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नरवणे हे युद्धनितीतील सर्वात मोठे जाणकारही आहेत.
तसेच जनरल नरवणे हे पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. लष्करप्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपतोय.
लष्करी नियमानुसार सीडीएसला ६५ वर्ष वयापर्यंत त्या पदावर रहाता येते. तर इतर तीनही सैन्यदल प्रमुखांना वयाच्या ६२ वर्षापर्यंत त्या पदावर रहाता येते.