Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

Nilesh Jadhav

भारतीय नौदल (Indian Navy) हा देशाच्या लष्करी सामर्थ्याचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्यात भारतीय नौदलाचेही महत्त्वाचे योगदान आहे.

भारतात दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिवस साजरा केला जातो. आजच्याच दिवशी १९७१ च्या युध्दात भारतीय नौदलानं पाकिस्तानला धूळ चारली होती. त्याच विजयाच्या स्मरणार्थ भारतात ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो.

परंतु या आधुनिक आणि शक्तिशाली नौदलाची स्थापना ज्या महान व्यक्तीने केली होती त्यांचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज! 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र; आरमार हे एक स्वतंत्र्य राज्यांच आहे,’ हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं.

स्वराज्य आणि मराठा सामाज्राचा विस्तार होत असताना, शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक (father of Indian Navy) असे म्हटले जाते.

शिवाजी महाराजांनी आपली लष्करी संघटना तयार करण्यात मोठे कौशल्य दाखवले .समुद्री व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर मजबूत नौदल अस्तित्व निर्माण केले. शिवाजीच्या अधिपत्याखालील नौदल इतकं मजबूत होतं की मराठ्यांनी ब्रिटीश, पोर्तुगीज आणि डच यांच्या विरोधात आपला प्रतिकार केला.

सिद्दीच्या ताफ्यांच्या हल्ल्यांपासून सुरक्षित किनारपट्टी असणे आणि पश्चिम कोकण किनारपट्टीचे संरक्षण करण्याचे महत्त्व शिवाजी महाराजांना कळले. आपल्या राज्याचे संरक्षण आणि बळकट करण्यासाठी एक मजबूत नौदल तयार करणे ही त्यांची रणनीती होती. शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी आणि गोवा या शहरांमध्ये लढाऊ नौदल तसेच व्यापारासाठी जहाजे बांधली.

दुरुस्ती, साठवण आणि निवारा यासाठी त्यांनी अनेक सागरी किल्ले आणि तळही बांधले. शिवाजी महाराजांनी किनारपट्टीवर जंजिऱ्याच्या सिद्दींशी अनेक प्रदीर्घ लढाया केल्या. १६० ते ७०० व्यापारी, सपोर्ट आणि लढाऊ जहाजे असा ताफा वाढला. दख्खनमधील आठ-नऊ बंदरे ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी स्वतःहून परकीयांशी व्यापार सुरू केला.

कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे पाहिले सेना प्रमुख, आरमाराच्या प्रमुखाला दर्यासागर म्हणत. महाराजांच्या आरमारात अनेक मुसलमान सैनिकही सेवेत होते. इब्राहिम आणि दौलत खान त्यातील एक होते. सिद्दी इब्राहीम आर्टिलरीचे प्रमुख होते. ज्याला आजच्या आधुनिक नौदलाचा भाग समजले जाते.

शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे समुद्री सीमांचे सरंक्षण होऊन बळकटी आली. पुढे मराठा साम्राज्याचा मोठा विस्तार झाला. मराठा सैन्याचा एक भाग म्हणून मजबूत आरमाराकडेही पाहिले जाऊ लागले. महाराजांच्या या नौदल रणनीतीचा उल्लेख आजही गौरवाने केला जातो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते.