Nilesh Jadhav
नोबेल पारितोषिक विजेत्या आणि म्यानमारच्या लोकशाही समर्थक नेत्या आंग सान सू की यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. म्यानमारच्या एका न्यायालयाने करोना नियमांचं उल्लंघन करणे तसेच सैन्याविरोधात असंतोष भडकवण्याच्या आरोपाखाली ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
म्यानमारमध्ये लष्करी बंडानंतर आंग सांग सू की गेल्या १ फेब्रुवारीपासून कोठडीत आहेत. आता शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांना निवडणूकही लढवता येणार नाही. याआधी एका न्यायालयाने आंग सांग सू की यांच्या पक्षातील दोन सदस्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये ९० तसेच ७५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
म्यानमारमध्ये सत्तापालटानंतर एक वर्षाची आणीबाणी लागू करण्यात आली आणि लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्यात आले. तेव्हापासून लष्करी नेते जनरल मिन आंग हुलिंग हे देशाचे पंतप्रधान आहेत.
याबाबत बोलताना जनरल हुलिंग म्हणाले की, देशातील आणीबाणी २०२३ मध्ये हटवली जाईल आणि सार्वत्रिक निवडणुका होतील. या सत्तापालटानंतर म्यानमारमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता, ज्यात ९४० लोकांचा मृत्यू झाला.
देशात लोकशाहीव्यवस्था आणण्यासाठी लष्करी राजवटीविरुद्ध सुमारे २५ वर्षे संघर्ष केला. म्यानमारच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी ९ जून २०१२ रोजी पहिल्यांदा संसदेत पाऊल ठेवले.
लष्करी राजवटीविरुद्ध केलेल्या आंदोलनामुळे आंग सांग सू की यांना अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागली. आंग सांग सू की यांना १९९१ साली नोबेल शांतता पुरस्कार बहाल करण्यात आला.
त्यानंतर १९९२ साली भारत सरकारने त्यांनी म्यानमारमधील लष्करी जुलूमशाही राजवटीविरुद्ध चालवलेल्या अहिंसा चळवळीसाठी त्यांना जवाहरलाल नेहरु शांतता पुरस्कार देऊन गौरवले.
आंग सांग सू की यांचे नाव तीन वेगवेगळ्या नावांच्या आधारावर आहे, आँग सान हे वडिलांकडून, की हे आईकडून तर सू हे आजीच्या नावातून आले आहे. त्यांच्या पतीचे नांव मायकेल असून मुलांचे नांव अलेक्झांडर आणि किम असे आहे.