Dr. Pankaj Patil
वयाच्या 18 व्या वर्षी ती दुरदर्शनवर वृत्तनिवेदीका म्हणून काम करू लागली. वृत्तनिवेदीका ते चित्रपट अभिनेत्री म्हणून तीचा प्रवास सुरू झाला. आणि…. ऐन उमेदीच्या काळात तीच्या आयुष्याचा प्रवास संपला तो लेकाचे आयुष्य सुने सुने करूनच.
ती अभिनेत्री म्हणजे खान्देश कन्या स्मिता पाटील होय. सुंदर आणि बोलका चेहरा,हसरे डोळे आणि गोड आवाज यामुळे अल्पावधीतच दूरदर्शऩचे प्रेक्षक तीचे चाहते झालेत. अनेकजण् तर चक्क तीला आणि तीलाच पाहण्यासाठी बातम्या लावत असत.
त्याचवेळी प्रसिद्ध दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या नरजेत ती आली आणि त्यानी तिला चित्रपटात अभिनयाची संधी दिली.
'चरणदास चोर' या चित्रपटात तिने एक छोटासा अभिनय केला. नंतर निशांत या चित्रपटातली तिला संधी मिळाली.
अभिनयाची अनभिषक्त सम्राज्ञी, कोट्यवधी मनांवर अधिराज्य करणारी स्मिता पाटीलचं वयाच्या 31 व्या वर्षी आजारपणामुळे हे जग सोडावं लागलं आणि अवघी सिनेसृष्टी हळहळली.
स्मिता पाटील हिचा जन्म पुण्याचा. तिचे वडील शिवाजीराव पाटील हे राजकारणी आणि समाजवादी विचारांचे नेते, तर आई विद्याताई पाटील या समाजसुधारिका.आई-वडील हे पुरोगामी विचाराचे असल्याने तसेच संस्कार स्मितावर झाले. स्मिता लहानपणापासूनच नाटकात भाग घ्यायची.
नंतरच्या काळात स्मिताचा परिवार पुण्याहून मुंबईला शिफ्ट झाले आणि तिच्या आयुष्याला एक नवं वळण मिळालं.
स्मिता पाटील हिच्या अभिनयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिने बहुतांश समांतर चित्रपटात काम केलं. स्मिता पाटील हिच्या आयुष्यावर तिच्या आईचा प्रभाव असल्याने तिचे व्यक्तिमत्वही तसंच खुलत गेलं.
तिचा अभिनय हा नैसर्गिक असाच होत गेला. 'उंबरठा' या मराठी चित्रपटात साकारलेली भूमिका ही स्मिताच्या आईचीच असल्याचं स्पष्ट होतंय.
स्मिताने सुनिल दत्त यांनी निर्मित केलेल्या कँन्सरवर आधारित 'दर्द का रिश्ता' चित्रपटात केवळ एक रुपयाचं मानधन घेऊन काम केले होते.
'शक्ती' आणि 'नमक हलाल' अशा व्यावसायिक चित्रपटातही स्मिताने काम केलं. नमक हलाल या चित्रपटातील 'आज रपट जाये तो हमे ना उठय्यो' हे गाणं प्रचंड गाजलं.
स्मिता पाटील म्हणजे एक वादळच होतं. पण याच वादळाच्या आयुष्यात एक वादळ आलं.
विवाहित असलेल्या राज बब्बरवर तिचं प्रेम जडलं. महिलांच्या समस्येवर स्मिता नेहमीच आवाज उठवायची. त्याच स्मिताने एका लग्न झालेल्या महिलेच्या आयुष्याचं नुकसान करू नये असं तिच्या आईला वाटायचं.
राज बब्बरने तिच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. त्यामुळे स्मिताच्या आणि राज बब्बरच्या लग्नाला त्यांचा विरोध होता. पण स्मिता प्रचंड जिद्दी होती. तिने राज बब्बरलाच आपला जोडीदार निवडला.
आयुष्यातील अत्यंत खडतर तणावाच्या काळातून, मानसिकतेतून जाणाऱ्या स्मिताला मुलगा झाला, पण त्यानंतर तिला नेटल प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलं. समाजातील रूढी परंपरांना आपल्या रील आणि रिअल लाईफमध्ये आव्हान देणाऱ्या स्मिताला यातून बाहेर पडता आलं नाही
राज बब्बर सोबत वैवाहिक जीवन जगत असतांना त्यांच्या आयुष्यात गोड क्षण आला.. स्मिता ने एका गोड मुलाला जन्म दिला. आणि यातच तीला आजार झाला. बाळांतपणाच्या पंधरा दिवसातच स्मिता नावाच्या या वादळानं 13 डिसेंबर 1986 रोजी जगाचा निरोप घेतला. आपल्या नवजात मुलाचा चेहराही न पाहता ती कायमची सोडून गेली.
प्रतिक बब्बर हा तीचाच मुलगा. ज्याने आईला कधीच पाहीले नाही. मात्र आजही तो आईच्या छायाचित्रातूनच आईचे प्रेम मिळवित आहे.
चित्रपट सृष्टीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल स्मिताला 1985 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
मंथन, भूमिका, आक्रोश, चक्र, निशांत, वारीस, अर्थ, मिर्च मसाला, आज, नजराणा या चित्रपटातील भूमिकांनी तिने रसिकांच्या मनावर वेगळीच छाप उमटवली. तसेच सामना, जैत रे जैत, राजा शिव छत्रपती, उंबरठा या सारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची उंची दाखवली.
'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात् आहे' हे गीत ऐकताना आजही अनेकांच्या डोळ्यासमोर स्मिता पाटील येते.
स्मिता पाटीलचे निधन होऊन तब्बल 36 वर्षे झाली तरी ती रसिकांच्या मनावर आजही राज्य करते. स्मिताविना आजही मैफिल सुनी सुनी अशीच वाटतेय.