विशाल निकम ठरला Bigg Boss Marathi 3 चा विजेता, जाणून त्याच्याविषयी...

Nilesh Jadhav

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ (Bigg Boss) हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो. यंदाच्या तिसऱ्या पर्वातील बिग बॉस मराठीचा विजेता (Bigg Boss Marathi 3 winner) कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

अखेर बिग बॉस मराठीच्या विजेत्याची घोषणा झाली. विशाल निकम (vishal nikam) हा स्पर्धक बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा (Bigg Boss Marathi 3) विजेता ठरला आहे. बिग बॉसचा विजेता ठरलेल्या विशाल निकम याने घरातील अनेक तगड्या स्पर्धकांना मागे सारुन बिग बॉसचं जेतेपद पटकावलं आहे. जाणून घेऊया विशाल निकम आहे तरी कोण.

विशालचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ रोजी सांगली जिल्ह्यातील देवखिंडी येथे झाला. सांगलीतील विटा येथून त्याने भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली आहे. विशालला अभिनयासोबतच फिटनेसची देखील आवड आहे.

त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचे तर त्याने मिथुन चित्रपटातून २०१८ मधे चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले. विशालने त्याच्या करिअरची सुरुवात मिथुन या सिनेमाद्वारे केली. या सिनेमामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत अमृता धोंगडे ही अभिनेत्री होती.

त्यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत युवराज ही मध्यवर्ती भूमिका साकारली. ही त्याची पहिली मालिका होती. त्यानंतर विशालनं धुमस या मराठी सिनेमातही काम केलं.

परंतु विशालला लोकप्रियता मिळाली ती दख्खनचा राजा ज्योतिबा आणि जय भवानी जय शिवाजी या टीव्ही मालिकांमुळं. या मालिकेने त्याला एक वेगळी ओळख दिली. या सगळ्या प्रवासात त्याला बिग बॉस मराठी तीसऱ्या पर्वात जाण्याची संधी मिळाली.