The Kashmir Files च्या दिग्दर्शकच्या सुरक्षेबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

Nilesh Jadhav

सध्या द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट चर्चेत आहे. ११ मार्च रोजी प्रदर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. काश्मीरमध्ये (Kashmir) झालेला नरसंहार आणि काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत राधे-श्याम सारख्या चित्रपटांना स्पर्धा दिली आहे. या चित्रपटाने जवळपास सहा दिवसांत बंपर कमाई केली असून लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करेल. याच चित्रपटाचे पीएम मोदींनीही कौतुक केले आणि आता गृहमंत्री अमित शहा देखील या चित्रपटाचे कौतुक करताना दिसले.

दरम्यान एकीकडं देशभरातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, दुसरीकडं अनेकांकडून चित्रपटावर जोरदार टीका देखील केली जात आहे. सोशल मीडियावर देखील अशाच प्रकारचे दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत.

याच पार्श्वभूमीवर 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना 'Y' दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. अग्निहोत्रींच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात करण्यात आले असून त्यांचा मुक्काम आणि भारतभर प्रवासादरम्यान CRPF कडून त्यांचं रक्षण केलं जाणार आहे.

Y दर्जाची सुरक्षा म्हणजे आठ सुरक्षारक्षक तैनात केले जातात. यामध्ये त्याच्या घरी पाच सशस्त्र स्टॅटिक गार्ड तैनात केले जातात. तसेच, तीन शिफ्टमध्ये तीन पीएसओ सुरक्षारक्षक कार्यरत असतात.

'Y' दर्जाची सुरक्षा प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक आणि क्रीडापटू यांना सरकारकडून सुरक्षा दिली जाते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची, याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो. एक्स, वाय, झेड आणि एसपीजी कमांडो असे सुरक्षेचे विविध प्रकार आहेत.