Salman Khan : अभिनेता सलमान खानला अंधेरी न्यायालयाचे समन्स... काय आहे प्रकरण?

Nilesh Jadhav

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman khan) अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. काळवीट शिकार प्रकरणात दिलासा मिळाला असतानाच आता तो पुन्हा एका प्रकरणात अडकला आहे.

सलमान खानने पत्रकारासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने (Andheri Magistrate Court) ५ एप्रिलला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने सलमान खानला आयपीसी कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत समन्स बजावलं आहे. (Salman Khan latest news)

२०१९ मध्ये पत्रकार अशोक पांडे यांनी सलमान खानवर गैरवर्तन केल्याचा आरोप करत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

यावर आता सलमानला प्रत्यक्ष हजर न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. अन्यथा, आपल्या वकिलांमार्फत त्याला आपले प्रतिनिधीत्व करायचे आहे.

सलमान अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात सायकल चालवत असताना अशोक पांडे यांनी त्याच्या जवळपास १५ ते २० मिनीटे पाठलाग करत व्हिडिओ बनवला. यावेळी सलमानसोबत झालेल्या वादामुळे अशोक पांडे यांनी तक्रार दाखल केली.

व्हिडिओ बनवत असल्याने सलमानला राग आला. त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर आपल्याला शिवीगाळ केली असा आरोपही पांडे यांनी केला आहे.

दरम्यान, आता सलमान खान न्यायालयात हजर राहणार की, नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.