PHOTO : का होतेय अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी?

Nilesh Jadhav

अल्लू अर्जुनची (Allu Arjun) प्रमुख भूमिका असलेला 'पुष्पा'(Pushpa)हा सिनेमा बॉक्स ऑफिस आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे.

सिनेमातील डायलॉग, गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे. असं असताना 'पुष्पा' सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शिवार फाऊंडेशनचे संस्थापक सुभाष साळवे यांचे लेखी पत्र आले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पुष्पा सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

‘पुष्पा’ या चित्रपटात पोलीस वर्दीचा वापर करून जनतेचा पोलीस प्रशासनवरील विश्वास उठेल असं दृश्य दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस बांधवांना आणि पोलीस समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशी तक्रार त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

चित्रपट निर्माता व अभिनेता यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावं आणि चित्रपटावर बंदी घालण्यात यावी. असं चित्रीकरण थांबायला पाहिजे यासाठी महाराष्ट्र गृहमंत्र्यांनी पाऊल उचलावं, जेणेकरून कुठलाही अभिनेता व निर्माता पोलीस प्रशासन, खाकीचा अवमान करण्याच हिंमत करणार नाही,' अशी मागणी सुभाष साळवे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

‘पुष्पा’ हा सिनेमा गत १७ डिसेंबरला रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. करोना काळात सुद्धा या चित्रपटाला पे्रक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा पार करत बक्कळ कमाई केली आहे.

तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे.