मोदींचे ‘मेकिंग इंडिया’, तर काँग्रेसचे ‘ब्रेकिंग इंडिया’: अमित शहा

0
नवी दिल्ली : ‘केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार ‘मेकिंग इंडिया’साठी काम करत असताना, काँग्रस पक्ष मात्र देशाला तोडण्याचे काम करत आहे’, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. दिल्लीत आयोजित भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. भाजप आगामी लोकसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात शनिवारी सुरू झाली.  राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्व सदस्य, मुख्यमंत्री उपस्थित होते.२०१९च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक एकजूट करत असल्याचे सांगत शहा यांनी विरोधकांवरही टीकास्त्र सोडले. विरोधकांची महाआघाडी असत्यावर आधारित आहे, असे सांगत भाजप कार्यकर्त्यांनी विरोधकांबाबतचे सत्य लोकांपर्यंत पोहोचवावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यावरही या बैठकीत प्रकाश टाकण्यात आला.

केंद्र सरकार तिहेरी तलाकचा कायदा करण्याविषयी कटिबद्ध आहे. मात्र, राज्यसभेत काँग्रेसच्या आडमुठ्या धोरणामुळे हे विधेयक अडकून पडले आहे, ‘एनआरसी’च्या मुद्द्याविषयी भाजप संवेदनशील आहे. अफगाणिस्तान, बांगला देश आणि पाकिस्तान येथील हिंदू, बौद्ध, शीख, जैन आदी शरणार्थींना आश्रय दिला पाहिजे, असेही पक्षाचे मत असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांनी सरकारच्या लोकाभिमुख योजना समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत घेऊन जाव्यात, असे आवाहन शहा यांनी केले. आयुष्यमान भारत, शेतकर्‍यांना उत्पादनाच्या दीडपट हमीभाव, ओबीसी आयोगास घटनात्मक दर्जा देणे, कृषी विमा योजना, जनधन योजना, सौभाग्य योजना या आणि अशा अनेक योजनांचा फायदा गरीब, ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमाती, युवक, स्त्रिया यांना होत आहे. अर्थव्यवस्था जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली आहे. तीन लाख बोगस कंपन्या रद्द करण्यात आल्या आहेत, करदात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितल्याचे त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

*