Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशअमेरिकेने रोखला जागतिक आरोग्य संघटनेचा निधी

अमेरिकेने रोखला जागतिक आरोग्य संघटनेचा निधी

सार्वमत

नवी दिल्ली – कोरोना संकटासाठी चीन धार्जिण्या जागतिक आरोग्य संघटनेला जबाबदार धरत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघटनेला अमेरिकेकडून दिला जाणारा निधी थांबवला आहे. जागतिक आरोग्य संघटना ही चीन धार्जिणी बनली असून कोरोना विषाणूबाबत जागृती करण्यात तिने विलंब लावला असा आरोपही त्यांनी केला. मंगळवारी सायंकाळी व्हाईट हाऊसमध्ये पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली.
जगभरात कोरोनाच्या संसर्गासाठी चीन कारणीभूत असतानाही, चीनकेंद्रित भूमिका घेणार्‍या जागतिक आरोग्य संघटनेबाबत ट्रम्प यांनी अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. कोरोना व्हायरसच्या सुरुवातीपासूनच ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या जागतिक संकटाच्या काळातही ही संघटना चीनकेंद्रित काम करीत असल्याने, संघटनेचा निधी रोखला जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी याआधीही दिला होता. आता त्यांनी तो प्रत्यक्षात अंमलात आणला आहे. अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला दरवर्षी सुमारे 500 दशलक्ष डॉलर्सची मदत केली जाते. हीच मदत रोखण्यात येत आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. हा निधी रोखण्याचा आदेश मी दिला आहे, असे सांगताना त्यांनी, या संघटनेवर कोरोना व्हायरसचे गांभीर्य लपविण्याचा आणि धोका माहीत असतानाही योग्य पावले न उचलण्याचा आरोपही केला. जागतिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या या संघटनेचे जगभरात वर्षभर अनेक उपकम सुरू असतात. यासाठी प्रत्येक देश संघटनेत आपले योगदान देत असतो. अमेरिका अनेक वर्षांपासून सर्वाधिक निधी देणार देश आहे. अमेरिकेने मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेला 400 दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला होता, जो संघटनेच्या एकूण अर्थसंकल्पाच्या 15 टक्के आहे. या तुलनेत चीनचा निधी अतिशय कमी आहे. चीनने गेल्या वर्षी 76 दशलक्ष डॉलर्स इतका निधी दिला होता. अमेरिकेने हा निधी रोखल्याने जागतिक आरोग्य संघटनेला मोठा झटका बसला असल्याचे या संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे. अमेरिकेने असा कठोर निर्णय घेण्याची ही वेळ नाही, असेही या अधिकार्‍यांचे मत आहे.

- Advertisement -

चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेचे अमेरिका कनेक्शन
नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरामधून जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. चीनने जंगली प्राण्यांची मांसविक्री होणार्‍या बाजारामधून या विषाणूचा संसर्ग मानवाला झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर हा विषाणू वटवाघळांमधून मानवामध्ये आल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, चीनमधील वुहान शहरातील एका प्रयोगशाळेसंदर्भात शंका व्यक्त करण्यात आली. मांसविक्री करणार्‍या बाजांरापासून काही किलोमीटरवर असणारी ही प्रयोगशाळा चीनमधील सर्वात मोठी प्रयोगशाळा असल्याचे समजते. आता या चर्चेत असणार्‍या प्रयोगशाळेला अमेरिकेनेच निधी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनमधील डेली मेलने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. हे वृत्त वुहानमधील या प्रयोगशाळेशी संबंधित काही कागदपत्रांच्या आधारे डेली मेलने दिले आहे. या कागदपत्रांनुसार अमेरिकन सरकारने विषाणूंवर संशोधन करणार्‍या या प्रयोगशाळेला 28 कोटींचा निधी दिला होता. गत काही वर्षात टप्प्या-टप्प्यात हा निधी देण्यात आला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेतील नेत्यांनाही मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
कोरोना विषाणूचा जगभरामध्ये प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेकांनी चीनसंदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. वुहान येथील व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये प्रयोगादरम्यान कोरोनाचा विषाणू पसरला गेल्याची शंका अनेकांनी व्यक्त केली आहे. या विषाणूचा संसर्ग नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्यानंतर चीनने याचा संसर्ग मांसविक्री होणार्‍या बाजारातून झाल्याची माहिती दिली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या अध्यक्षतेखालील कोबरा या आपत्कालीन गटातील सदस्यानेही वुहानमधील प्रयोगशाळेतून विषाणू पसरत गेल्याचे तर्क विश्वास ठेवण्यासारखे असल्याचे मत नोंदविले होते. अमेरिकेतून चीनमधील प्रयोगशाळेला मदत केली जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेतील काही नेत्यांनी याला विरोध केला आहे. प्राण्यांवर होणार्‍या धोकादायक आणि हिंसक प्रयोगांसाठी अमेरिकन सरकारने निधी दिल्याचा आरोप काही नेत्यांनी केला आहे.
अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने वुहानमधील व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटला 28 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. कदाचित जगभरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यामागे चीनमधील ज्या प्रयोगशाळेचा संबंध आहे त्या प्रयोगशाळेला अमेरिकेने निधी दिला आहे हे समजल्यानंतर मला खूप दुख: झाले, असे मत अमेरिकेतील खासदार मॅट गेट्स यांनी नोंदविले आहे. अमेरिकेतील व्हाइट कोट वेस्ट या विचारवंताच्या गटाचे अध्यक्ष अँथनी बेलॉटी यांनीही अमेरिकेने चीनला मदत केल्याच्या वृत्तावरुन अमेरिकन सरकारवर टीका केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या