Type to search

Featured सार्वमत

महापालिकेच्या चुकीमुळे करमणूक कर थकित

Share

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधी रुपये अडकले : वसुलीसाठी माहिती देखील नाही

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका कार्यक्षेत्रातील करमणूक कर जमा करण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही गेल्या दोन वर्षांपासून हा कर जमा केलाच नसल्याचे मंगळवारी झालेल्या सभेत उघड झाले. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नगरसेवक शाम नळकांडे यांनी निदर्शनास आणून देताच आयुक्तांसह संबंधित अधिकार्‍यांनी सर्व कर थकबाकीसह वसूल करण्यात येईल, असे उत्तर देऊन वेळ मारून नेली.

महापालिका कार्यक्षेत्रातील चित्रपटगृह, व्हिडिओ हॉल, संगणकावरील विविध गेमचे पार्लर, केबल आदी ठिकाणचा करमणूक कर यापूर्वी जिल्हा प्रशासन जमा करत असत. मात्र महापालिका स्थापन झाल्यानंतर हा कर जमा करण्याची जबाबदारी महापालिकेची असते. जमा झालेले कर महापालिकेला स्वउत्पन्न म्हणून वापरता येते. 29 मे 2017 पासून या कराच्या वसुलीचे काम जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्यानंतर करमणूक कर वसुलीसाठी महापालिकेने कोणतीही व्यवस्था केली नाही. कालांतराने शहर प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी असलेले अंबादास सोनवणे यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. दैनंदिन कामातून त्यांनाही या कामाकडे पाहण्यासाठी वेळ मिळाला नाही.

त्यामुळे त्यांनीही याबाबतची कोणतीही माहिती संकलित केली नाही. करमणुकीसाठी विक्री करण्यात आलेल्या प्रत्येक तिकीटामागे अठरा टक्के कर महापालिकेला उपलब्ध होतो. मात्र गेल्या दोन वर्षात याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नगरसेवक शाम नळकांडे यांनी सभेत हा विषय उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारला. केवळ जाब विचारून ते थांबले नाहीत, तर महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍याकडून कोट्यवधींचा कर वसूल करावा आणि संबंधितांवर दप्तर दिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

सोनवणे यांनीही सभेसमोर करमणूक कर वसुलीबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे स्पष्ट केले. नळकांडे यांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्‍नांना त्यांच्याकडे उत्तरे नसल्याचेही निदर्शनास आले. तसेच माझ्याकडे या कामासाठी अन्य कर्मचारी नसल्याचेही सोनवणे यांनी स्पष्ट केल्यामुळे कोट्यवधींचा कर मिळणार्‍या बाबींकडे महापालिका प्रशासन किती दुर्लक्ष करते, हे देखील समोर आले.

कारवाई नाहीच…
एरवी पैसा नाही, म्हणून नगरसेवकांनी सुचविलेली कामे केली जात नसताना कोट्यवधीच्या कर वसुलीकडे झालेल्या दुर्लक्षाबद्दल कारवाई करावी, अशी मागणी नळकांडे यांनी केली. मात्र कारवाईबाबत आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी मिठाची गुळणी घेतली. सोशल मीडियावर क्वार्टरचा उल्लेख केल्यामुळे एखाद्या कर्मचार्‍याला निलंबित करण्यात येत असेल, तर कोट्यवधींचा कर थकविण्यास कारणीभूत ठरणार्‍याला अभय का, असा प्रश्‍न महेंद्र गंधे यांनी उपस्थित केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!